मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना संरक्षण देण्याची गोरक्षकांची मागणी

पुणे – महाराष्ट्रात गोरक्षणाच्या कामात अग्रस्थानी असलेले श्री. शिवशंकर स्वामी यांना मारण्यासाठी गोमाफियांनी ८ कोटी रुपये जमा केले असून काही गुन्हेगारांना सुपारी दिली आहे. ही माहिती पोलिसांकडे आहे. (सरकारने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित गुन्हेगारांसह त्यांच्यावर आतापर्यंत कारवाई न करणार्‍या पोलिसांनाही कारागृहात टाकले पाहिजे ! – संपादक) काही कसायांच्या सांगण्यावरून श्री. स्वामी यांना असलेले पोलीस संरक्षण महाराष्ट्र सरकारला काढायला लावले आहे. (हे जर सत्य असेल, तर याची चौकशी करून उत्तरदायींवर कारवाई झाली पाहिजे ! – संपादक) आजमितीस श्री. स्वामी यांना कुठलेही पोलीस संरक्षण नाही. त्यांना जीव मुठीत धरून गोरक्षणाचे कार्य करावे लागते. हे लक्षात घेऊने त्यांना लवकरात लवकर पोलीस संरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी गोरक्षक कौस्तुभ सोमवंशी यांनी समस्त गोरक्षकांच्या वतीने केली. (गोरक्षकांच्य जीवाला धोका असतांना त्यांना संरक्षण देण्याची मागणी का करावी लागते ? पोलीस स्वतःहून ते का देत नाही ? ‘गोरक्षणाचे कार्य करणार्‍या गोरक्षकांना संरक्षण देण्याऐवजी पोलीस कसायांची बाजू घेत आहेत का ?’ असा प्रश्‍न कुणाला पडल्यास चूक ते काय ? – संपादक) श्री. स्वामी यांच्या संदर्भात कुठलाही अघटित प्रकार घडलाच, तर त्याला महाराष्ट्र सरकार आणि पोलीस-प्रशासन उत्तरदायी असतील, असेही त्यांनी सांगितले.

गोरक्षकांनी उपस्थिती केलेली सूत्रे

१. श्री. शिवशंकर स्वामी यांच्यावर पूर्वी अनेक वेळा प्राणघातक आक्रमणे झाली आहेत. एक वर्षापूर्वी त्यांच्यावर आळेफाटा येथे जीवघेणे आक्रमण झाले होते.

२. जसा प्रकार पंजाबमधील नुकतीच हत्या करण्यात आलेले गायक सिद्धू मुसेवाला यांच्या संदर्भात घडला, अगदी तसाच प्रकार श्री. शिवशंकर स्वामी यांच्या संदर्भातही घडू शकतो. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येच्या अन्वेषणाचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोचले असतांना सरकारला हे लक्षात यायला हवे. जाणून बुजून कसायांना खुश करण्यासाठी हे केले जात आहे का ?

संपादकीय भूमिका

  • गोमातेसह तिचे रक्षण करणारे गोरक्षक संकटात, तर गोहत्या करणारे कसाई मोकाट असणे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
  • सर्वत्रच्या गोहत्या रोखण्यासाठी केंद्र सरकारने आता देशपातळीवर गोहत्याबंदी कायदा करून त्याची कठोर कार्यवाही करणे आवश्यक आहे !