नोकरीचे आमीष दाखवून पैसे उकळल्याची गोव्यातील विविध प्रकरणे
पणजी, ५ नोव्हेंबर (वार्ता.) – नोकरीचे आमीष दाखवून पैसे उकळल्याचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले आहे. सरकारी नोकरी देण्याचे आमीष दाखवून अनेकांची फसवणूक केल्याची तक्रार शिवा मोरे आणि सरिता केरकर यांच्या विरोधात जुने गोवे पोलिसात प्रविष्ट (दाखल) झालेली आहे. या प्रकरणी दोन्ही संशयितांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. न्यायालयात या प्रकरणी ८ नोव्हेंबर या दिवशी सुनावणी होणार आहे.
दीपश्री सावंत गावस हिला पोलीस कोठडी
फोंडा – नोकरीचे आमीष दाखवून पैसे उकळल्याच्या प्रकरणी संशयित दीपश्री सावंत गावस हिला फोंडा प्रथमश्रेणी न्यायालयाने २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, तसेच तिच्या नावावर असलेल्या ३ चारचाकी आणि २ दुचाकी पोलिसांनी कह्यात घेतल्या आहेत. माशेल येथील एका शाळेमध्ये नोकरी देण्याचे आमीष दाखवून उसगाव येथील एका महिलेची फसवणूक केल्याच्या प्रकरणी दीपश्री सावंत गावस हिला कह्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी आणखी २ जणांना कह्यात घेऊन त्यांची पुढे जामिनावर सुटका झालेली आहे.
सावर्डे येथील व्यक्तीकडून १० लाख उकळले
सरकारी नोकरी देण्याचे आमीष दाखवून सावर्डे येथील एका व्यक्तीकडून १० लाख रुपये उकळल्याच्या अन्य एका प्रकरणी पोलिसांच्या कह्यात असलेला संशयित सागर नाईक याला फोंडा प्रथमश्रेणी न्यायालयाने ५ नोव्हेंबर या दिवशी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.