तळमळ, चिकाटी आणि एकाग्रता या गुणांमुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा संपादन करणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. अनिरुद्ध राजंदेकर आणि सर्वांशी जवळीक साधून इतरांना साहाय्य करणार्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर !
माघ शुक्ल पक्ष सप्तमी, रथसप्तमी (७.२.२०२२) या दिवशी श्री. अनिरुद्ध विष्णु राजंदेकर (वय ३८ वर्षे) आणि सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (वय ३८ वर्षे) यांच्या विवाहाचा १५ वा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने श्री. विष्णु राजंदेकर (श्री. अनिरुद्ध यांचे वडील) आणि सौ. आरती राजंदेकर (श्री. अनिरुद्ध यांची आई) आणि त्यांची मुलगी कु. श्रिया राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय १० वर्षे) यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. श्री. अनिरुद्ध राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे
श्री. विष्णु दि. राजंदेकर (श्री. अनिरुद्ध राजंदेकर यांचे वडील (वय ७० वर्षे)), पुणे
१. लहानपणी अनिरुद्धला लाभलेले संतांचे आशीर्वाद !
१ अ. भागवत कथा वाचणार्या महाराजांनी अनिरुद्धला श्रीकृष्णाचा पोषाख घालून खांद्यावर घेऊन भागवत मिरवणुकीत नाचत भजने म्हणतांना अनिरुद्ध शांत बसणे : ‘लहान असतांना अनिरुद्ध त्याच्या आजीच्या मांडीवर बसून एकाग्रतेने भागवत कथा ऐकत असे. कथा वाचणार्या महाराजांच्या ते लक्षात आले. भागवत मिरवणूक निघाल्यावर त्यांनी अनिरुद्धला श्रीकृष्णाचा पोषाख घालून त्याला खांद्यावर घेतले आणि ते नाचत भजन म्हणू लागले. तेव्हा एवढ्या लहान वयात न घाबरता अनिरुद्ध शांतपणे आणि आनंदी राहून उत्सवात एकरूप झाला होता.
१ आ. अनिरुद्धने लहान असतांना प.पू. नाना महाराज तराणेकर यांना भावपूर्ण नमस्कार केल्यावर त्यांनी त्याला उचलून मांडीवर घेऊन प्रसाद स्वरूपात एक रुपयाचे नाणे देणे : ‘चि. अनिरुद्ध ३ वर्षांचा असतांना आम्ही इंदूर येथील संत प.पू. नाना महाराज तराणेकर यांच्या दर्शनाला गेलो होतो. तेथे त्यांच्या दर्शनासाठी मोठी रांग होती. सर्व भक्त प.पू. नाना महाराज यांच्या दर्शनासाठी मुला-बाळांना घेऊन आले होते. पालक मुलांना बळजोरीने प.पू. नाना महाराज यांना नमस्कार करण्यास लावत असतांना ती मुले रडत असत. आमचा क्रमांक आल्यावर अनिरुद्धने प.पू. नाना महाराज यांच्या चरणी डोके टेकवून भावपूर्ण नमस्कार केला. तेव्हा प.पू. नाना महाराज यांनी त्याला चटकन उचलून मांडीवर बसवले. अनिरुद्ध त्यांच्या तोंडवळ्याकडे भावपूर्ण बघत होता. प.पू. नाना महाराज यांनी प्रसाद म्हणून एक रुपयाचे नाणे त्याच्या हातावर ठेवले. ते पाहून आमची भावजागृती झाली.
२. सनातन संस्थेशी संपर्क आणि साधना चालू होणे
२ अ. कलेचा उपयोग साधना म्हणून करणे
१. आम्ही सनातन संस्थेच्या संपर्कात आलो. तेव्हा सर्व जण ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा आणि कुलदेवीचा नामजप करत असत. त्या वेळी वयाच्या १३ – १४ व्या वर्षी ज्या साधकांना हव्या असतील, त्यांना तो नामपट्या हाती लिहून देत असे. अनिरुद्धने एका साधकाच्या भिंतीवर गुरुकृपायोगाचा ‘लोगो’ रंगवून (पेंटींग करून) दिला. तो बघून सर्वांची भावजागृती होत असे.
२. ‘आपल्या कलेचा उपयोग ‘साधना म्हणून व्हावा’ यासाठी तो वितरण कक्षाची (स्टॉलची) मांडणी अतिशय आकर्षक करून सेवा करायचा. त्यामुळे सर्व लोक ते बघायला येत असत.
३. लहान वयातच पूर्णवेळ साधना करण्याचे ठरवणे आणि त्यासाठी गोवा येथील आश्रमात रहायला जाणे : त्याला लहान वयातच पूर्णवेळ साधना करण्याची इच्छा होती. तेव्हा तो कुठेही आणि कशातही न अडकता आश्रमात रहायला गेला. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) कृपेने आश्रमात रहायला गेल्यावर त्याने ‘तेथील सेवा शिकून घेणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांना अपेक्षित अशी सेवा करणे’, हे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न केले.
४. अनिरुद्धने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित सेवा करण्यासाठी तळमळीने आणि चिकाटीने प्रयत्न करणे : आम्ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या (प.पू. गुरुदेवांच्या) दर्शनासाठी रामनाथी येथे गेलो होतो. तेव्हा प.पू. गुरुदेव आम्हाला म्हणाले, ‘‘हा छायाचित्रे चांगली काढतो.’’ तेव्हा आमची पुष्कळ भावजागृती झाली. नंतरही पुढील काळात ‘भावपूर्ण कृती करणे, प.पू. गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा करणे, एकाग्रता, तळमळ आणि चिकाटी’ या गुणांमुळे त्याच्यावर प.पू. गुरुदेवांची कृपा झाली. पुढे त्याचा लाभ त्याला सेवा आणि व्यवसाय यांत प्रगती करून घेण्यासाठी झाला.’
सौ. आरती राजंदेकर (श्री. अनिरुद्ध राजंदेकर यांची आई (वय ६३ वर्षे)) पुणे
१. अवघ्या १६ व्या वर्षी पूर्णवेळ साधना करण्याचे ठरवून आश्रमात जाणे : ‘अवघ्या १६ व्या वर्षी अनिरुद्ध प.पू. गुरुदेवांकडे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडे) जायचे’, हे ध्येय ठेवून आश्रमात जायला निघाला. तेव्हा सर्व नातेवाईक आम्हाला नावे ठेवत होते; पण ‘त्याचे कल्याण होईलच’, याची मला निश्चिती होती. त्या वेळी माझ्या मनात ‘गुरुकुलात जाऊन शिष्यावर गुरुकृपा कशी झाली ?’, हा गुरुचरित्रात सांगितलेला प्रसंग होता. प.पू. गुरुदेवांच्या कृपेने अनिरुद्धच्या उदाहरणावरून मला प्रत्यक्ष ‘याची देही, याची डोळा’ हे अनुभवता आले.
२. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आवडेल’, अशी प्रत्येकच कृती भावपूर्ण कशी करायची ?’, हे अनिरुद्धकडून शिकता येणे : लहानपणापासून अनिरुद्धच्या कृतींतून परिश्रम करण्याची सिद्धता, चिकाटी आणि मिळालेली सेवा पूर्ण करण्याची तळमळ हे गुण दिसत होते. मला त्याच्याकडून ‘भावपूर्ण कृती कशी करायची ?, म्हणजे ‘प.पू. गुरुदेवांना (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना) ती आवडेल, अशी कृती करणे’, हे शिकता आले. त्यातून मला ‘स्वयंपाक भावपूर्ण कसा करायचा ?’, हे लक्षात आले. एकदा अशा पद्धतीने मी बेसनाचे लाडू करून अनिरुद्धच्या समवेत प.पू. गुरुदेवांना पाठवले. तेव्हा ‘गुरुदेवांना ते पुष्कळ आवडले’, असे अनिरुद्धने मला कळवले. तेव्हा माझा भाव जागृत झाला.
३. भावजागृती करणारे प्रसंग कळवून भावजागृतीसाठी साहाय्य करणे : अनिरुद्ध आश्रमात असतांना गुरुदेवांविषयीचे भावप्रसंग कळवत असे. तेव्हा भावजागृती होऊन माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वहात असत.
४. जागतिक पातळीचे पारितोषिक मिळणे : व्यावहारिक शिक्षणापेक्षा गुरुदेवांनी जे ज्ञान दिले, त्यामुळे त्याला जागतिक पातळीचे न्यूयॉर्क (अमेरिका) येथील कॅटलिना चित्रपट महोत्सवात ‘वन्यजीव संरक्षण’ या लघुपटाच्या उत्तम दिग्दर्शनासाठी पारितोषिक (‘अवॉर्ड’) मिळाले. ही खरी गुरुकृपा आहे.
‘त्याची साधनेतही प्रगती होऊन त्याच्यावर गुरुकृपा होवो’, हीच गुरुचरणी प्रार्थना !’
कु. श्रिया राजंदेकर (मुलगी) (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के (वय १० वर्षे), फोंडा, गोवा.
१. प्रांजळ : ‘मी विचारलेल्या एखाद्या प्रश्नाचे उत्तर बाबांना ठाऊक नसेल, तर ते ‘मी शोधून सांगतो’, असे मला सांगतात आणि त्या प्रश्नाचे उत्तर ते जिज्ञासेने शोधून मला सांगतात.
२. प्रेमळ : माझ्याकडून चुका झाल्या, तर ते मला त्याची जाणीव करून देतात आणि ‘मी त्या स्वभावदोषांवर कसे प्रयत्न करायचे ?’, हेही ते मला प्रेमाने समजावून सांगतात.
३. अनुसंधान : बाबा अधिकाधिक अनुसंधानात राहून प.पू. गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) अस्तित्व अनुभवण्याचा प्रयत्न करतात.
४. सेवेची तळमळ
४ अ. बाबांना आश्रमातून कुठलीही सेवा सांगितली, तरी ती सेवा प.पू. गुरुदेवांना अपेक्षित अशी करण्याची त्यांची तळमळ असते.
४ आ. इतरांना साधनेसाठी प्रवृत्त करण्याची तळमळ : व्यवसायानिमित्त त्यांच्या संपर्कात येणार्या प्रत्येकाला साधना कळावी, ‘प.पू. गुरुदेव यांचे विचार कळावेत’, यासाठी बाबा सतत तळमळीने प्रयत्न करतात. ‘त्यांना साधना सांगणे, त्यांना विविध ग्रंथांची माहिती देणे, त्यांना साधनेसाठी प्रेरित करणे, ‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या संकेतस्थळाची माहिती सांगणे, रामनाथी (गोवा) आश्रम बघायला येण्यासाठी प्रवृत्त करणे’, असे प्रयत्न ते करतात.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव आणि श्रद्धा असणे : बाबांच्या मनात प.पू. गुरुदेवांच्या प्रती दृढ भाव आणि श्रद्धा आहे. कुणाशीही प.पू. गुरुदेवांविषयी बोलतांना ते भावपूर्ण आणि श्रद्धेने बोलतात.’
२. सौ. मानसी राजंदेकर (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांची गुरुकृपेने लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये
श्री. विष्णु दि. राजंदेकर (श्री. अनिरुद्ध राजंदेकर यांचे वडील (वय ७० वर्षे)), पुणे
१. प.पू. पांडे महाराज यांनी ‘सून अधिक सरस आणि कार्यक्षम आहे’, असे होणार्या सूनेचे कौतुक करणे : प.पू. पांडे महाराज अनिरुद्ध आणि मानसी यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला घरी आले होते. त्या वेळी प.पू. पांडे महाराज मला म्हणाले, ‘‘तुमच्या मुलापेक्षा तुमची सून अधिक सरस आणि सक्षम आहे.’’ तेव्हा ‘गुरुदेवांनी साध्या आणि सरळ स्वभावाच्या अनिरुद्धसाठी योग्य वधूची निवड केली’, असे वाटून मला कृतज्ञता वाटली. तिच्या सहकार्यामुळे अनिरुद्धला साधना आणि व्यवहार यांत पुष्कळ प्रगती करता आली.
२. घरी महालक्ष्मी उत्सव पुष्कळ भावपूर्णपणे साजरा करणे : मानसीने ‘आपल्या घरी महालक्ष्मी उत्सव व्हावा’, अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा आम्हाला आनंद झाला. तिने व्यवस्थित नियोजन केल्यामुळे महालक्ष्मी उत्सव भावपूर्ण साजरा झाला. त्या दिवशी घरात पुष्कळ चैतन्य जाणवत होते. तिने केलेली भावपूर्ण पूजा पाहून माझी भावजागृती झाली.
३. दोन दैवी बालकांचे मातृत्व लाभणे : कु. श्रियासारखी (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) (वय १० वर्षे) दैवी बालिका आणि पू. वामन (वय ३ वर्षे) यांच्यासारखे संत पोटी देऊन गुरुदेवांनी तिला (सौ. मानसीला) कृपाप्रसाद दिला, त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !
४. ‘संतसेवा कशी करावी ?’, हे मानसीकडून शिकता येणे : प.पू. गुरुदेवांच्या कृपेने पू. वामन यांचा जन्म झाल्यावर मानसी देहभान विसरून त्यांची भावपूर्ण सेवा करत आहे. ‘संतसेवा कशी करावी ?’, हे आम्हाला सौ. मानसीकडून शिकता आले.
५. इतरांना आनंद देणे : सौ. मानसी पू. वामन यांच्या बाललीला सातत्याने आम्हाला कळवते. त्यामुळे आमची भावजागृती होते.
६. साधनेसाठी साहाय्य करणे : साधनेचे प्रयत्न करतांना आम्ही काही अडचण तिला कळवली, तर ती त्वरित संतांना विचारून आम्हाला सकारात्मक दृष्टीकोन देऊन साहाय्य करते. त्यामुळे आम्हाला तिचा मोठा आधार वाटतो.
‘अनिरुद्ध आणि सौ. मानसी यांची उत्तरोत्तर साधनेतून प्रगती होवो’, हीच प.पू. गुरुदेवांच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना !
सौ. आरती राजंदेकर (सौ. मानसी यांच्या सासूबाई (वय ६३ वर्षे)) पुणे
१. इतरांना प्रेमाने साहाय्य करणे
अ. गुरुदेवांनी अनिरुद्धचे व्यावहारिक जीवनही सुखाचे होण्यासाठी सौ. मानसीची निवड केली. सौ. मानसीमध्ये जवळीकता साधणे, इतरांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर साहाय्य करणे, हे गुण आहेत.
आ. साधनेत आल्यावर माझा सौ. मानसीशी परिचय झाला होता. मी रुग्णाईत असतांना ती मला आवर्जून भेटायला येत असे. तेव्हा मला तिचा आधार वाटत असे. त्या दोघांचे लग्न झाल्यानंतरही ती माझी प्रेमाने काळजी घेते.
२. उत्तम निरीक्षणक्षमता : उत्तम निरीक्षणक्षमता या गुणामुळे ती पू. वामन यांच्याविषयीचे प्रसंग लिहून ठेवते. ते ऐकून आम्हा सर्वांची भावजागृती होते. त्यातून ‘संतांच्या कृती आणि त्यांच्या लीला कशा असतात ?’, हे आम्हाला शिकायला मिळते. प.पू. गुरुदेवांच्या कृपेमुळे तिला ‘संतचरित्र लिहिता आले’, ही भाग्यदायक घटना आहे.
‘सौ. मानसीची जलद आध्यात्मिक उन्नती होवो’, हीच गुरुचरणी प्रार्थना.’
कु. श्रिया राजंदेकर (मुलगी) (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के (वय १० वर्षे), फोंडा, गोवा.
१. आनंदी : आईकडे कधीही पाहिले, तर ती आनंदीच दिसते. तिच्या तोंडवळ्यावर कधीच नकारात्मकता किंवा दुःख दिसत नाही. तिच्याकडे पाहिल्यावर मलाही आनंद होतो.
२. आवड-नावड नसणे : आईला आवड-नावड नाही. तिचे ‘मला हेच आवडते आणि मला असेच हवे आहे’, असे कधीच नसते. जे आहे, त्यातच तिला आनंद असतो.
३. प्रेमाने समजावून सांगणे : आई मला ‘साधनेप्रती गांभीर्य कसे असले पाहिजे ?’, हे प्रेमाने समजावून सांगते. माझ्याकडून कुठली चूक झाली असेल, तर ती मला समजावून सांगते आणि ‘तशी चूक होऊ नये; म्हणून काय करायचे ?’, हेही ती मला समजावून सांगते.
४. इतरांचा विचार करणे : आई नेहमी इतरांचा विचार करते. ‘माझी विश्रांती होत नाही किंवा मला माझे वैयक्तिक आवरायला पुरेसा वेळ मिळत नाही’, असा विचार ती कधी करत नाही. तिचा ‘प.पू. गुरुदेवांना अपेक्षित आहे, तेच होणार आहे आणि तेच माझ्याकडून त्यांना अपेक्षित असे करून घेणार आहेत’, असा भाव असतो.
५. चुकीची खंत वाटून क्षमायाचना करणे : कधी आईकडून कुठली चूक झाली, तर तिला त्याची खंत वाटते आणि ती प.पू. गुरुदेवांच्या चरणी क्षमायाचना करते.
६. आज्ञापालन : पू. वामन यांनी ‘आपण खेळूया’, असे म्हटले आणि तेव्हा आईला दुसरी काही सेवा असली, तरी ‘ईश्वरेच्छा आणि संतांचे आज्ञापालन’, या भावाने ती पू. वामन यांच्याशी खेळते.
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव ! : आईचा प.पू. गुरुदेवांच्या प्रती भाव आहे. ती मला सांगते, ‘भावप्रयोगाच्या माध्यमातून आपण प.पू. गुरुदेवांच्या खोलीत जाऊन त्यांची पाद्यपूजा करूया.’ ती माझ्याकडून तसा भावप्रयोगही करून घेते. ते भावप्रयोग इतके सुंदर असतात की, ‘त्या स्थितीतून बाहेर येऊ नये’, असे मला वाटते. ते सांगत असतांनाही तिचाही भाव जागृत होतो.
८. कृतज्ञता : ‘गुरुदेवांनी मला इतके छान आई-बाबा दिले आणि त्यांचे इतके गुण शिकायला दिले’, यासाठी मला प.पू. गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता वाटते. ‘हे सर्व त्यांनीच माझ्याकडून लिहून घेतले’ यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |