पणजी, २५ सप्टेंबर (वार्ता.) – वर्ष २०२२ मध्ये होणार्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी आक्रमक धोरण अवलंबण्याची सूचना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस समितीचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांनी देहली येथे एक बैठक घेतली आणि या बैठकीत पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी सहभाग घेतला. या बैठकीत पक्षाचे ज्येष्ठ निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम्, पक्षाचे महासचिव के.सी. वेणुगोपाल, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, गोव्यातील विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आणि मी सहभागी झालो होतो. राहुल गांधी यांना गोव्यातील काँग्रेसने गोमंतकियांच्या अपेक्षा पूर्ण केलेल्या आणि त्यांच्या भावनांचा आदर केलेला पाहिजे. विधानसभेच्या वर्ष २०२२ मधील निवडणुकीत काँग्रेस विजयी होणार आणि या विजयी यात्रेत पक्षाचे शुभचिंतक आणि पक्षाला पाठिंबा दर्शवणारे यांचा सहभाग असणार आहे. आगामी निवडणुकीत भाजपचा नक्कीच पराभव होणार आहे.’’
गोव्यात काँग्रेसमध्ये गृहकलह
तृणमूल काँग्रेसचे खासदार गोव्यात पोचल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षात गृहकलह उफाळून आला आहे. नावेलीचे आमदार लुईझिन फालेरो यांच्यासह काँग्रेसचे काही नेते तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. पक्षाचे नेते आग्नेल फर्नांडिस आणि यतीश नाईक यांनी पक्षाच्या धोरणाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पक्षाचे महासचिव मारियो पिंटो आणि सचिव विजय पै यांनीही पक्षावर विविध आरोप केले आहेत आणि यामुळे काँग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर आली आहे. तृणमूल काँग्रेसने ख्रिस्ती मतदार आणि ख्रिस्ती नेते यांना लक्ष्य केले आहे आणि यामुळे काँग्रेसची ख्रिस्ती मतदारांवरील मक्तेदारी निसटून जाते कि काय ? अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना वाटू लागली आहे. (बहुसंख्य हिंदू असलेल्या भारतात आणि गोव्यातही लोकप्रतिनिधींना अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करावेसे वाटते; कारण अल्पसंख्यांक संघटितपणे कोणत्या पक्षाला त्यांच्या समुदायाने मते द्यावीत, ते ठरवतात. त्यामुळे कोणत्याही पक्षाचे सरकार आले, तरी ते अल्पसंख्यांकांचे चोचले पुरवतात. याउलट हिंदू एकसंघ नसल्याने बहुसंख्य असूनही दुर्लक्षित रहातात ! – संपादक)