गुन्ह्यांचे अन्वेषण, नाकाबंदी, अतीमहनीय व्यक्तींची सुरक्षा, सण-उत्सव काळातील बंदोबस्त, कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे यांसाठी स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता पोलीस दिवस-रात्र जनतेचे संरक्षण करत आहेत; मात्र दुर्दैवाने सद्यःस्थितीत त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जात आहे. विविध कारणांनी पोलिसांवरील आक्रमणांच्या नवनवीन घटना प्रतिदिन समोर येत आहेत. पोलिसांवर हात उगारण्याची अपप्रवृत्ती राज्यात वाढत आहे. धर्मांध, गुन्हेगार इतकेच नाही, तर सध्या महिलाही पोलिसांवर हात उगारत आहेत. कायद्याचे रक्षक असलेल्या पोलिसांवरच हात उचलण्याचे धैर्य होणे, ही खरोखरीच चिंताजनक आणि पोलिसांचा धाक संपत आल्याचे द्योतक आहे. याच्या मुळाशी जाऊन विचार होणे आवश्यक आहे.
गेल्या काही वर्षांचा विचार केल्यास भरदिवसाही गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून जनतेच्या मनातील असुरक्षिततेची भावना वाढत आहे. याचा खोलात जाऊन विचार केला, तर या स्थितीकरता पोलीसही तितकेच उत्तरदायी आहेत. पोलिसांकडून होत असलेला भ्रष्टाचार, कर्तव्यचुकारपणा, गुन्हेगारांशी असलेले लागेबांधे याही गोष्टी तितक्याच कारणीभूत आहेत. काही पोलिसांचे असभ्य आणि उर्मट वर्तन, अरेरावी, तक्रारदाराची तक्रार तात्काळ नोंदवून न घेता गुन्हेगाराला साहाय्य करणे यांमुळे पोलिसांची प्रतिमा नकारात्मक होते. त्यामुळे लोकांच्या मनात पोलिसांविषयी आदर, भीती, दरारा यांपेक्षा चीड निर्माण होत आहे. मुळात कायद्याची भीती आणि वचकच सद्यःस्थितीत न्यून झाला आहे. त्यासाठी पोलिसांनीही स्वतःची भ्रष्ट प्रतिमा पालटून कर्तव्यनिष्ठता आणि प्रामाणिकपणा या गुणांच्या आधारे ‘आदर्श पोलीस’ होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. पोलिसांवर आक्रमण करणार्यांवर कठोर कारवाई केली, तरच अन्य कुणी असे कृत्य करण्याचे धाडस करणार नाही. सध्या पोलीस यंत्रणेत होत असलेला राजकीय हस्तक्षेप पूर्णपणे बंद करणे अशा विविध उपाययोजना केल्यास पोलीस स्वतंत्रपणे स्वत:चे काम करू शकतील. त्याचप्रमाणे पोलीस प्रशासनातील वरिष्ठांनीही पोलिसांचे मनोधैर्य वाढवण्यासह त्यांची स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.
– सौ. अपर्णा जगताप, पुणेघरोघरी आयुर्वेद