एका संतांची भेट झाल्यानंतर ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. सुमित सागवेकर यांनी अनुभवलेली भावस्थिती !

‘एकदा माझी एका संतांशी भेट झाली. तिसर्‍या दिवशी पुढील अनुभूती लिहीपर्यंत ‘मला त्यांचे अस्तित्व सूक्ष्मातून सतत जाणवत होते आणि ‘ते सतत काहीतरी माझ्याशी बोलत आहेत’, असेही मला वाटत होते.

श्री. सुमित सागवेकर

१. संतांची भेट झाल्याचा दुसरा दिवस

१ अ. सकाळी ‘उजव्या डोळ्यातून पाणी येत आहे’, असे जाणवणे : दुसर्‍या दिवशी सकाळी ‘माझ्या उजव्या डोळ्यातून पाणी येत आहे’, असे मला जाणवू लागले. मी डोळ्याखाली हात लावल्यावर माझ्या हाताला पाणी लागले नाही; पण पाण्याचा स्पर्श माझ्या त्वचेला जाणवत होता. असे दिवसातून ५ – ६ वेळा झाले. ही अनुभूती आल्यानंतर माझा भाव जागृत व्हायचा. ‘यामागील कारण काय ?’, ते कळले नाही.

१ आ. ध्यानाच्या वेळी ‘कृतज्ञता’, असा नामजप आपोआप चालू होणे : सकाळी ९.३० वाजता ध्यानाच्या वेळी माझा ‘कृतज्ञता’, असा नामजप अखंड आणि आपोआप चालू झाला अन् माझा भाव जागृत झाला. तेव्हा ‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांशी बसून त्यांचे चरण घट्ट पकडून ठेवावे’, असे मला वाटत होते.

१ इ. दुपारी सेवेचे आणि साधनेचे विचार मनात येऊन अनावश्यक विचार न येणे : दुसर्‍या दिवशी दुपारी समष्टी सेवेचे आणि ‘साधनेत पुढे कसे जायचे ?’, याविषयीचे विचार माझ्या मनात येत होते. त्या दिवशी माझ्या मनात कोणताही अनावश्यक विचार आला नाही. एखादा प्रसंग घडण्यापूर्वीच माझ्या मनाला स्वभावदोष किंवा अहं यांची जाणीव होत होती आणि त्यासंबंधीची स्वयंसूचना मनात दिली जात होती. त्यामुळे त्या प्रसंगात स्वभावदोष किंवा अहं यांच्या पैलूवर मात करायला मला सोपे जात होते.

१ ई. संध्याकाळी व्याख्यान देतांना गुरुदेव ‘विषय मांडण्यासाठी ज्ञानशक्ती देत आहेत’, असे जाणवणे : दुसर्‍या दिवशी संध्याकाळी मला व्याख्यानाची सेवा होती. मला व्याख्यानासाठी कक्षात बसायचेे होते. तिथे गुरुदेवांनी वापरलेली आसंदी होती. मी त्या आसंदीसमोर व्याख्यान देण्यासाठी बसलो आणि ‘हे त्यांचेच नियोजन आहे’, याची मला जाणीव झाली. ‘ते व्याख्यानातील प्रत्येक शब्द ऐकत आहेत’, असे मला जाणवले. ते मला ‘विषय मांडण्यासाठी ज्ञानशक्ती देत आहेत’, असेही जाणवले. व्याख्यान झाल्यावर मला ‘विषय सांगितला नाही किंवा सांगितला’, असे काही वाटत नव्हते.

१ उ. रात्री सूक्ष्मातून गुरुदेवांशी बोलत झोपल्यावर ‘मन स्थिर झाले आहे’, असे जाणवणे : दुसर्‍या दिवशी रात्री मी गुरुदेवांशी बोलतच झोपलो होतो. त्यामुळे सकाळी उठल्यावर माझ्या लक्षात आले, ‘रात्रभर माझे स्वप्न चालू होते. प.पू. गुरुदेव माझ्याशी रात्रभर बोलत होते.’ मला त्यांचा आवाज येत नव्हता, तरी ‘मी त्यांच्याशी रात्रभर बोलत होतो’, याची मला जाणीव होत होती. ‘माझ्या मनाची अंतर्मुखता वाढली आहे’, असे जाणवून ‘मन स्थिर झाले आहे’, असे मला जाणवले.

२. तिसरा दिवस

मला लेख लिहिण्याची सेवा करायची होती; परंतु त्याचे नियोजन आणि सुचण्याचा भाग होत नव्हता. त्या वेळी माझी गुरुदेवांना पुष्कळ तळमळीने प्रार्थना झाली आणि ५ मिनिटांत त्याचे नियोजन झाले. त्या वेळी ‘विषय सुचण्याचा माझा भाग वाढला आहे’, असे मला जाणवले.

मला हे केवळ गुुरूंच्या कृपेमुळे अनुभवता आले. ‘गुरुदेवा, माझी ही स्थिती अशीच टिकून राहू दे. तुम्हीच माझ्याकडून हिंंदु राष्ट्राची सेवा करवून घ्या. मला तुमच्या चरणांशी एकरूप होता येऊ दे’, अशी तुमच्या चरणी आर्ततेने प्रार्थना करतो.’

– श्री. सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती.

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक