पुणे महानगर परिवहन मंडळाची सेवा सामान्यांसाठी बंद ठेवल्यामुळे नागरिकांचे हाल !

पुणे, ७ एप्रिल – राज्य सरकारने नव्याने जाहीर केलेल्या नियमानुसार सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेत बाजारपेठा आणि विविध आस्थापनांना चालू ठेवण्यास अनुमती दिली आहे. तसेच दिवसा जमावबंदी आणि रात्रीला संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक वाहतुकीलाही अनुमती दिली आहे; परंतु पुणे महानगर परिवहन मंडळाची (पी.एम्.पी.) सेवा बंद ठेवण्याच्या जिल्हा प्रशासनाच्या निर्णयाने नागरिकांचे हाल होत आहेत. मर्यादित स्वरूपात एकूण आसन क्षमतेच्या निम्म्या क्षमतेने वाहतूक चालू ठेवावी, अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे. तसेच पुण्याची जीवनवाहिनी असलेली पी.एम्.पी. बंद ठेवल्याने एकप्रकारे तो अर्थचक्राला धक्काच आहे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

‘पी.एम्.पी. प्रवासी मंच’चे सचिव संजय शितोळे यांनी सांगितले की, पी.एम्.पी.मध्ये मर्यादित प्रवाशांना प्रवेश देऊन बस सेवा चालवणे शक्य आहे; मात्र गर्दी होईलच, या भीतीने बस बंद ठेवणे चुकीचे आहे. परिस्थितीवर नियंत्रण राखता येत नाही, हे प्रशासनाचे अपयश आहे. त्याचा भुर्दंड पुणेकर, सामान्य प्रवासी यांना नको. प्रशासनाने याचा गांभीर्याने विचार करावा.