खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांच्याकडून नगर येथील वाळू तस्करीसंबंधीचे पुरावे एकत्र

कारवाई न झाल्यास उपोषण करण्याची चेतावणी

नगर, ७ एप्रिल – येथील वाळू तस्करीसंबंधीचे पुरावे संकलित केल्याचा दावा भाजपचे नगरचे खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांनी केला आहे. जिल्ह्यातून वहाणार्‍या नद्यांच्या पात्रात सध्या यंत्रांच्या साहाय्याने लिलावातील अटी-शर्ती आणि नियम-कायदे धाब्यावर बसवून बेसुमार वाळू उपसा चालू आहे. यासंबंधीचे व्हिडिओ, ‘जीपीएस् लोकेशन’ असे पुरावे आमच्याकडे आहेत. ते आम्ही जिल्हाधिकार्‍यांना देणार आहोत, तसेच ७ दिवसांत यावर कारवाई झाली नाही, तर उपोषण करण्याची चेतावणी त्यांनी पारनेर तालुक्यात बोलतांना दिली आहे. (खासदारांनी पुरावे गोळा करायचे तर मग प्रशासन काय कामाचे ? प्रशासन स्वत:हून कारवाई का करत नाही कि त्यांचे वाळू तस्करांशी काही हितसंबध आहेत ? असे कुणाला वाटल्यास आश्‍चर्य ते काय ! – संपादक) ज्या आमदारांचा वाळू तस्करीला पाठिंबा नाही, त्यांनीही उपोषणात सहभागी व्हावे, असे आवाहनही विखे-पाटील यांनी केले आहे.