खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची माहिती
सातारा, १ एप्रिल (वार्ता.) – सातारावासियांची तहान भागवणार्या कास धरणाची उंची वाढवण्याच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. तसेच या कामासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास विभागाकडून ‘महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोथ्थान अभियान’ अंतर्गत ५७ कोटी ९१ लाख संमत झाले असून त्यापैकी २५ कोटी रुपये ३० मार्च या दिवशी सातारा नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात आले आहेत, अशी माहिती भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सामाजिक संकेतस्थळाच्या (फेसबूकच्या) माध्यमातून दिली आहे.
खासदार भोसले यांनी काही दिवसांपूर्वी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. तेव्हा धरणाची उंची वाढवण्यासमवेत विविध विकासकामांविषयी प्रस्ताव देण्यात आले होते. गत दीड वर्षापासून कास धरणाची उंची वाढवण्याचे काम चालू आहे. डिसेंबर २०२० मध्ये या कामासाठी सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळवण्यात आली. पूर्ण झालेल्या कामांची आवश्यक असणारी उपयोगिता प्रमाणपत्रेही संबंधित विभागाकडे सादर करण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्याकडे उर्वरित कामांच्या पूर्ततेसाठी निधी वितरीत करण्याविषयी खासदारांनी मागणी केली.