नृत्यकलेमध्ये नाविन्यपूर्ण अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘सुर ताल हुनर का कमाल’ या जागतिक नृत्य स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर ५९ टक्के आध्यात्मिक पातळीची साधिका कु. अपाला औंधकर हिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली अपार कृपा !
१. ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’कडून ‘सुर ताल हुनर का कमाल’ या जागतिक नृत्य स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाल्यावर पुष्कळ आनंद होणे
‘कु. तेजलताईने (कु. तेजल पात्रीकर, समन्वयक, संगीत विभाग, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय) दूरभाष करून ‘सुर ताल हुनर का कमाल’ या जागतिक नृत्य स्पर्धेविषयी सांगितले आणि ‘तुम्हा चार जणींना ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’कडून या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळत आहे’, असे सांगितले. तेव्हा मला फार आनंद झाला. शाळेत प्रथम क्रमांक मिळाल्याचा आनंदही मला त्यापुढे कणमात्र वाटला. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला ही अमूल्य संधी मिळाली; म्हणून मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. मी ती कृतज्ञता शब्दांत सांगू शकत नाही.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध माध्यमांतून वेळोवेळी केलेले साहाय्य !
२ अ. ‘विनायक कौतुकम्’ या नृत्याचे चित्रीकरण पाहून कु. तेजल आणि सहसाधिका यांना आनंद जाणवणे, त्यांनी तेच गाणे नृत्यासाठी निवडणे अन् त्यातून ‘नृत्यासाठी आध्यात्मिक स्तरावर गाणे कसे निवडावे ?’, हे शिकता येणे : स्पर्धेसाठी नृत्याचे गाणे निवडायचे होते. तेव्हा मला तेजलताईने वेळोवेळी साहाय्य केले. ‘जणू तेजलताईच्या माध्यमातून गुरुदेवच मला साहाय्य करत आहेत’, असे मला वाटलेे. काही गाण्यांवर नृत्य करून मी त्याचे चित्रीकरण तेजलताईला पाठवले. त्यांतील ‘विनायक कौतुकम्’ या गाण्यावरचे नृत्य तेजलताई आणि तिच्या समवेत असणार्या साधिका यांना आवडलेे अन् ‘ते नृत्य पहातांना त्यांना आनंद जाणवला’, असेही तिने सांगितले. तेव्हा त्याच नृत्यावर स्पर्धेसाठी सराव करण्याचे ठरले. तेव्हा ‘गुरुदेवांच्या कृपेमुळे नृत्यासाठी आध्यात्मिक स्तरावर गाणे कसे निवडायचे ?’, हे मला शिकायला मिळाले आणि पुष्कळ कृतज्ञता वाटली.
२ आ. तेजलताईने प्रोत्साहन दिल्याने उत्साहाने नृत्याचा सराव करता येणे : या नृत्यातील प्रत्येक रचनेचा सराव करतांना मला पुष्कळ उत्साह जाणवत होता. भ्रमणभाषवर माझ्याशी बोलतांना तेजलताई नेहमी मला ‘अपाला, आनंदाने नृत्य कर’, असे सांगायची. त्याप्रमाणे मी उत्साहाने सराव करत होते.
२ इ. सराव करतांना पाय दुखणे, गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर पाय दुखण्याचे प्रमाण न्यून होऊन त्यानंतर पाय न दुखणे आणि सरावातून आनंद मिळू लागणे : सराव करतांना माझे पाय दुखायचे. तेव्हा मी गुरुदेवांना प्रार्थना करायचे, ‘हे गुरुदेवा, तुम्हीच माझ्या पायांना बळ द्या.’ मी माझ्या पायांना सांगायचे, ‘तुम्हाला गुरुदेव आणि श्री गणपतिबाप्पा यांच्या चरणी जायचे आहे. तुम्ही न थकता भावपूर्ण नृत्य करा.’ त्यानंतर हळूहळू माझे पाय दुखायचे प्रमाण न्यून झाले आणि नंतर कितीही सराव केला, तरीही पाय दुखले नाहीत. नृत्याचा सराव करतांना सतत प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त होऊन मला आनंद मिळू लागला.
२ ई. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांनी नृत्याच्या चित्रीकरणासाठी वेळोवेळी साहाय्य करणे : माझ्या आईला ‘नृत्याचे चित्रीकरण आणि त्याचे संकलन कसे करायचे ?’, याविषयी काहीच ठाऊक नव्हते. त्यामुळे आम्हाला थोडा ताण आला. त्या वेळी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधकांनी आम्हाला चित्रीकरण करण्याविषयी माहिती दिली. ‘चित्रीकरण किती अंतरावरून करायचे ? कुठल्या बाजूने आणि कुठल्या कोनातून चित्रीकरण करायचे ?’, याचे सर्व बारकावे त्यांनी सांगितल्यामुळे चित्रीकरण करणे पुष्कळ सोपे झाले आणि ताणही न्यून झाला. नंतर साधकांनीच त्याचे संकलनही केले. तेव्हाही तेजलताईने पुष्कळ सतर्कतेने वेळोवेळी साहाय्य केले. ‘गुरुदेवांनी या साधकांच्या माध्यमातून माझ्यासाठी किती वेळ दिला ?’, याची सतत जाणीव होऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.
२ उ. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे मार्गदर्शन मिळणे : श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी प्राथमिक सरावाच्या नृत्याचे चित्रीकरण पाहून नृत्यातील भाव आणि पदन्यास यांकडे अधिक लक्ष देण्यास सांगितले. तेव्हा श्री गुरुकृपेने त्यांंचे मार्गदर्शन मिळाल्याचा आनंद होऊन माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.
२ ऊ. पुष्कळ पाऊस असल्यामुळे घराच्या आगाशीत किंवा अंगणात नृत्य करणे अशक्य होणे आणि गुरुदेवांच्या कृपेने एका धर्मप्रेमी व्यक्तीने तिचे सभागृह चित्रीकरणासाठी उपलब्ध करून देणे : अंतिम चित्रीकरण करण्यापूर्वी हवामानातील पालटामुळे सलग ८ दिवस पाऊस पडत होता. घराच्या आगाशीत आणि अंगणात सततच्या पावसामुळे शेवाळेही साचले होते. त्यामुळे तेथे नृत्य करणे शक्यच नव्हते आणि घरातही पुरेशी जागा नव्हती. तेव्हा ‘नृत्याचे चित्रीकरण कुठे करावे ?’, हे आम्हाला कळत नव्हते. गुरुदेवांच्याच कृपेमुळे रत्नागिरीतील साधकांच्या साहाय्याने एका हिंदु धर्मप्रेमी आणि सनातनचे हितचिंतक असलेल्या व्यक्तीकडून तिचे सभागृह उपलब्ध झाले अन् चित्रीकरण करता आले.
३. नृत्याचे अंतिम चित्रीकरण करतांना साधना म्हणून केलेले प्रयत्न !
अ. १७.१०.२०२० या दिवशी नृत्याचे अंतिम चित्रीकरण करण्यासाठी सभागृहात जाण्यापूर्वी आणि गेल्यावरही माझ्याकडून पुष्कळ प्रार्थना होत होत्या. सभागृहात गेल्यावर मी माझ्यासमोर एक रिकामी आसंदी ठेवली आणि ‘तिथे परात्पर गुरु डॉक्टर बसणार आहेत आणि ते माझे नृत्य पहाणार आहेत’, असा भाव ठेवला.
आ. मी माझ्या पायांना सांगितले, ‘परात्पर गुरु डॉक्टर आणि गणपतिबाप्पा तुम्हाला पहाणार आहेत. तुम्ही दुखू नका.’ त्यामुळे माझे पाय दुखले नाहीत. चित्रीकरण करतांना मला ताणही आला नाही.
कुठल्याही प्रकारचे अडथळे न येता एकाच वेळी नृत्याचे चित्रीकरण अंतिम करता आले.
४. संतांनी नृत्याचे कौतुक केल्यावर ‘मला हवे असलेले सर्व मिळाले आहे, आता स्पर्धेचा निकाल काहीही असू दे’, असे वाटून कृतज्ञता व्यक्त होणे
एका संतांनी नृत्याचे चित्रीकरण पाहिल्यावर ‘नृत्य आणि चित्रीकरण दोन्ही चांगले झाले आहे’, असे सांगितले. तेव्हा ‘आता मला आणखी काही नको. त्यांच्या या शब्दांतूनच मला स्पर्धेतून मिळणारा सर्व आनंद मिळाला आहे. आता निकाल काहीही असू दे’, असे वाटून माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.
५. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली अपार कृपा !
५ अ. ‘सुर ताल हुनर का कमाल’ या स्पर्धेमध्ये उपांत्य फेरीसाठी निवड होणे आणि तेव्हा ‘गुरूंनी त्यांच्या संकल्पासाठी ही निवड केली’, असे वाटून कृतज्ञता व्यक्त होणे : नंतर मी रामनाथी आश्रमात रहायला गेले होते. २.२.२०२१ या दिवशी माझ्या आईने मला भ्रमणभाष करून ‘सुर ताल हुनर का कमाल’ या स्पर्धेमध्ये तुझी उपांत्य फेरीसाठी (‘सेमी फायनल’साठी) निवड झाली आहे’, असे कळवले. हे ऐकून प्रथम माझा विश्वासच बसला नाही. नंतर ‘तो गुरुदेवांचा संकल्प आहे’, असे माझ्या लक्षात आले. ईश्वरप्राप्तीसाठी केले जाणारे नृत्य भिन्न आहे आणि बाहेर मनोरंजनासाठी केले जाणारे नृत्य भिन्न आहे. माझ्या झालेल्या निवडीमुळे मला ‘गुरुदेवांचा संकल्प कार्यरत होत आहे’, असे वाटले. ‘माझी स्पर्धेसाठी निवड झाली’, यासाठी मला काहीच वाटले नाही; पण ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यांच्या संकल्पासाठी माझी निवड केली’, यासाठी मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.
५ आ. उपांत्य फेरीसाठी दिलेला ‘तिल्लाना’ हा नृत्यप्रकार बसवण्यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकेने साहाय्य करणे : यानंतर मी सरावाला आरंभ केला. त्यांनी उपांत्य फेरीसाठी मला ‘तिल्लाना’ हा विषय दिला. गुरुदेवांच्या कृपेमुळे माझा तो नृत्यप्रकार आधीच बसवून झाला होता. त्यामध्ये त्यांनी काही पालट सांगितले. ते पालट करायला मला महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधिकेने साहाय्य केले, तसेच ते नृत्य बसवतांना तिने मला ‘नृत्य करतांना भाव कसा ठेवावा ?’, हे सांगितले.
५ इ. नृत्याचे चित्रीकरण ३ टप्प्यांंत करायचे असणे आणि पहिली २ चित्रीकरणे करतांना ताण येणे : यानंतर मला साधारण दोन ते अडीच घंटे नृत्याचा सराव करायला मिळाला. त्याच दिवशी नृत्याचे चित्रीकरण करायला आरंभ झाला. नृत्याचे चित्रीकरण ३ टप्प्यांमध्ये करायचे होते. पहिली २ चित्रीकरणे करतांना मला ताण आला होता. मला काहीच समजत नव्हते. मी नृत्य करतांना माझे मुख हसरे ठेवण्याचा प्रयत्न केला; परंतु मला हसता येत नव्हते.
५ इ १. तिसरे चित्रीकरण चालू होण्यापूर्वी सहसाधिकेने भावप्रयोग करायला सांगणे आणि तसे प्रयत्न केल्यानंतर देवता अन् गुरुदेव यांचे दर्शन होऊन ‘त्यांच्याकडून पुष्कळ चैतन्य मिळत आहे’, असे जाणवणे : तिसरे चित्रीकरण चालू होण्यापूर्वी माझ्या सहसाधिकेने मला ‘साक्षात् परात्पर गुरु डॉक्टर समोर आहेत. छायाचित्रकाच्या (कॅमेराच्या) ‘लेन्स’मध्ये गुरुदेवांचे चरण आहेत. डाव्या बाजूला शेषशायी विष्णु आहे आणि उजव्या बाजूला भगवान शिव आहे’, असा भावप्रयोग करायला सांगितला. मी तसा भाव ठेवून नृत्य केल्यावर मला पुष्कळ चांगले वाटले. तसा भाव ठेवल्यावर मला तिथे देवता आणि गुरुदेव यांचे दर्शन झाले. ‘त्यांच्याकडून मला पुष्कळ चैतन्य मिळत आहे’, असेही मला जाणवले.
त्या वेळी मला वातावरणात पुष्कळ उष्णता जाणवत होती. वातानुकूलन यंत्र असूनही मला पुष्कळ गरम होत होते. नेहमीच्या तुलनेत माझ्या घुंगरांचे तापमानही वाढले होते. ते पुष्कळ गरम झाले होते.
५ ई. ‘भव्य चित्रीकरण कक्षात चांगल्या छायाचित्रकांनी चित्रीकरण करता आले’, ही गुरुदेवांची कृपा असल्याचे जाणवून भावजागृती होणे : नृत्याचे शेवटचे चित्रीकरण करतांना माझी भावजागृती झाली. मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. त्यांच्या कृपेमुळे इतक्या भव्य चित्रीकरण कक्षात चांगल्या छायाचित्रकांनी चित्रीकरण करता आले. ही सर्व त्यांचीच लीला आहे. ‘माझी आई येथे नसतांना परम पूज्यांनी मला त्याची जाणीवही होऊ दिली नाही’, असे वाटून कृतज्ञतेने माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वाहू लागले. त्यांच्या कृपेमुळेच नृत्याच्या गाण्याचे संकलन, चित्रीकरण आणि त्यानंतर त्या नृत्याचे संकलन अगदी सहजतेने झाले. साधकांनी त्यांचा अमूल्य वेळ या सर्वांसाठी दिला. ही केवळ गुरुदेवांचीच कृपा !
६. अनुभूती
६ अ. नृत्यातील मुद्रांचा अभ्यास करतांना श्री विनायक रूपातील श्री गणेशाचे तेजस्वी बालरूप दिसणे, त्याच्याकडून पुष्कळ चैतन्य प्रक्षेपित होत असल्याचे जाणवणे, ते ग्रहण करण्याचा प्रयत्न करणे आणि तेव्हा ‘त्याने नृत्यासाठी चैतन्य, आनंद आणि आशीर्वाद दिला’, असे जाणवून कृतज्ञता वाटणे : ८.१०.२०२० या दिवशी स्पर्धेसाठी नृत्याचे गाणे ठरले. त्या दिवशी मी नृत्यातील मुद्रांचा अभ्यास करतांना मला श्री गणेशाचे श्री विनायक रूपातील बालरूप दिसू लागले. माता पार्वतीदेवी त्याला मोदक भरवत होती. त्याचे रूप पुष्कळ तेजस्वी होते. ‘त्याच्या रूपातून सार्या सृष्टीकडे चैतन्य प्रक्षेपित होत आहे आणि मोदकामधून आनंदलहरी पसरत आहेत’, असे मला जाणवले. मी ते चैतन्य आणि आनंद ग्रहण करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मला मनातून पुकळ आनंद जाणवला. मी तो आनंद शब्दांत व्यक्त करू शकत नाही. सर्व देवतांनी स्वर्गातून श्री विनायक आणि श्री पार्वतीमाता यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांना नमन केले. श्री विनायकाने मला नृत्यासाठी पुष्कळ आनंद, चैतन्य आणि आशीर्वाद दिले’, असे मला वाटून माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.
६ आ. ‘गणपतिबाप्पा नृत्य पहात आहेत’, असे जाणवणे : नृत्याचे दुसर्या टप्प्याचे चित्रीकरण चालू असतांना मला पुष्कळ चैतन्यलहरी जाणवल्या आणि ‘गणपतिबाप्पा तेथे बसून माझे नृत्य पहात आहे’, असे मला जाणवले.
७. प्रार्थना आणि कृतज्ञता
‘गुरुदेवांच्या अपार कृपेमुळे मी पुष्कळ आनंद अनुभवला आणि मला पुष्कळ छान अनुभूतीही आल्या’, यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्प आहे. ‘गुरुदेवा, तुमची कृपादृष्टी माझ्यावर अखंड असू दे’, हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते.’
– कु. अपाला अमित औंधकर, रत्नागिरी (१७.१०.२०२०)
कु. अपालाच्या नृत्याचे चित्रीकरण पहातांना त्यात पुष्कळ ‘ऑर्बज्’ दिसणे आणि ते आनंदी दिसून त्यांच्याकडे पाहून चांगले वाटणे
‘नृत्याचे चित्रीकरण झाल्यावर ते चित्रीकरण संगणकावर पहातांना मागील पडद्यावर मला पुष्कळ ‘ऑर्बज्’ दिसले. त्यांच्याकडे पाहून मला चांगले वाटत होते. त्यांतील ‘एक ‘ऑर्ब’ आनंदाने उडी मारून दुसरीकडे उडाला’, असेही मला दिसले.’
– सौ. दीपा औंधकर (आई), रत्नागिरी (१७.१०.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |