शिवरायांच्या राज्यशैलीचे अनुकरण केल्यास भारत महासत्ता बनेल ! – छत्रपती उदयनराजे भोसले

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

सातारा – केवळ आम्हीच नाही, तर शिवरायांना मानणारी प्रत्येक व्यक्ती ही शिवरायांचा वंशज आहे. आगामी काळात शिवगान स्पर्धा अधिक व्यापक पद्धतीने आयोजित करण्यात आमचे नेहमीच सहकार्य राहील. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज एकमेवाद्वितीय राजे होते. शिवरायांच्या राज्यशैलीचे अनुकरण केल्यास भारत महासत्ता बनेल, असे प्रतिपादन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले.

भाजप सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शिवगान स्पर्धेच्या बक्षीस समारंभप्रसंगी ते बोलत होते. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप सांस्कृतिक शाखेचे राज्य संयोजक शैलेश गोजमगुंडे आणि इतर पदाधिकारी अन् कार्यकर्ते उपस्थित होते.

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले की, राष्ट्रीय एकात्मता साध्य करण्यासाठी शिवरायांची नीती आचरणात आणली पाहिजे. आठरापगड जातीसोबत घेऊन जात-पंथ-धर्म विरहित आदर्श समाजव्यवस्था शिवछत्रपतींनी आपल्याला दिली आहे. या माध्यमातून स्वराज्य निर्माण करण्याचे अतुलनीय कार्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी केले. त्यांच्या शब्दकोषात अशक्य हा शब्दच नव्हता, यामुळेच ते उत्तुंग कार्य करू शकले.