पाश्‍चात्त्यांच्या ‘डेज’ऐवजी हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्याचा सहभागी युवकांचा संकल्प !

योग वेदांत सेवा समितीच्या वतीने ‘मातृ-पितृ पूजनदिन’ मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि यवतमाळ जिल्ह्यांत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा

माता-पित्यांचे पूजन करतांना मुले आणि युवक

मुंबई / ठाणे – ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे युवकांमध्ये स्वैराचारी आणि चंगळवादी वृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. पाश्‍चात्त्यांचे अंधानुकरण करत हा दिवस साजरा करण्याऐवजी आपल्या माता-पित्यांविषयी आदरभाव वृद्धींगत करणारा ‘मातृ-पितृ पूजनदिन’ या वर्षीही योग वेदांत सेवा समितीच्या वतीने मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून साजरा करण्यात आला.

या पूजन कार्यक्रमांत सहस्रो पालक आणि मुले सहभागी झाली होती. मुंबईतील गोरेगाव (पूर्व) येथील संतश्री आसारामजी आश्रम यांसह मालाड, मुंबई सेंट्रल आणि मुंबईतील काही निवासी संकुलातही अशा स्वरूपाचे कार्यक्रम घेण्यात आले. ठाणे जिल्ह्यात बदलापूर येथील संतश्री आसारामजी आश्रम यांसह ठाणे शहर, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण, भिवंडी, वाशिंद, उल्हासनगर, अंबरनाथ आणि मीरा रोड येथे या कार्यक्रमांत पालक अन् युवक यांनी सहभाग घेतला. याप्रमाणेच पालघर जिल्ह्यात नालासोपारा येथे, तर रायगड जिल्ह्यात कामोठे आणि कळंबोली या ठिकाणीही हा दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. या वेळी या कार्यक्रमांत सहभागी झालेली लहान मुले आणि युवक यांनी पाश्‍चात्त्यांचे ‘डेज’ऐवजी माता-पित्यांना स्मरून हिंदु संस्कृतीनुसार आचरण करण्याचा संकल्प केला.

दीपप्रज्वलन, गणेश वंदना, गुरुप्रार्थना करून सर्व ठिकाणी कार्यक्रम आरंभ करण्यात आले. त्यानंतर मुलांनी मातापित्यांचे पूजन केले. पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या प्रेरणेने गेली १५ वर्षे हा उपक्रम यशस्वीपणे राबवला जात असून याला समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे अखिल मुंबई योग वेदांत सेवा समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

यवतमाळ येथे ‘मातृ-पितृ पूजनदिन’ उत्साहात साजरा !

यवतमाळ, १६ फेब्रुवारी (वार्ता.) – योग वेदांत सेवा समिती, युवा सेवा संघ आणि महिला उत्थान मंडळ यांच्या वतीने स्थानिक तहसील चौकातील जलशिव मंदिर येथे १४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ‘मातृ-पितृ पूजनदिन’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचा प्रारंभ पूज्यपाद संतश्री आसारामजी बापू यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आला. त्यानंतर बालसंस्कार केंद्रातील विद्यार्थ्यांनी त्यांच्या आई-वडिलांचे पूजन करून आशीर्वाद घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दीपाली वैद्य यांनी केले.