आंगणेवाडीवासियांच्या आरोग्य तपासणीसाठी २ मार्चपासून ४ आरोग्यपथके कार्यरत असणार

कोरोनामुळे श्री भराडीदेवी यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाचा निर्णय

मालवण – लाखो भाविकांच्या उपस्थितीत प्रतिवर्षी होणारी आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीची यात्रा यावर्षी कोरोनामुळे आंगणेवाडी ग्रामस्थांपुरती मर्यादित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या यात्रेमध्ये सहभागी होणार्‍या आंगणे कुटुंबियांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने अनुमती पत्र (पासेस) देऊन मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे. यात्रेनिमित्त गावात येणार्‍या आंगणे कुटुंबियांची आरोग्य तपासणी करण्यासाठी २ मार्चपासून गावात ४ आरोग्यपथके कार्यरत असतील, अशी माहिती गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांनी दिली आहे.

मालवण पंचायत समितीची मासिक सभा नुकतीच झाली. या वेळी जाधव यांनी ही माहिती दिली. आंगणेवाडी यात्रेला जवळपास ५ सहस्र आंगणे कुटुंबीय उपस्थित रहाणार आहेत; मात्र जिल्हाधिकार्‍यांनी न्यूनतीन्यून ग्रामस्थांनी यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. लोकप्रतिनिधींनीही भाविकांनी मंदिरात दर्शनाला न येता आपापल्या घरातूनच देवीला साकडे घालावे, प्रार्थना करावी, याविषयी प्रबोधन करावे, असे आवाहन गटविकास अधिकारी जाधव यांनी केले आहे. मंदिर परिसरात कोणत्याही प्रकारची दुकाने उभारण्यास मनाई असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.