पुणे – भूकंपाचे केंद्र पुण्यापासून २५ किमीच्या परिसरात आहे. गेल्या १७ वर्षांत असे ४ किमी तीव्रतेचे भूकंप नोंदवले गेले. कोयनेच्या भूकंपप्रवण क्षेत्राबाहेर पुण्यासारख्या महानगराच्या जवळपास केंद्र असलेले भूकंप हे अल्प तीव्रतेचे असले, तरी या घटनांचा भूशास्त्रीय अभ्यास होणे आवश्यक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. याविषयी जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे (जीएस्आय) निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. हेमंत आठवले म्हणाले, ‘‘पुणे परिसर भूकंप प्रवण क्षेत्राच्या ‘झोन ३’ म्हणजे सर्वसाधारण धोका असलेल्या क्षेत्रात येतो.’’
वरिष्ठ भूशास्त्रज्ञ डॉ. आप्पासाहेब साबळे यांच्या म्हणण्यानुसार अल्प तीव्रतेच्या भूकंपांमुळे कोणताही धोका नसतो; मात्र त्यांची वारंवारता वाढत असल्यास पुणे शहराची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन या भूकंपांमागील शास्त्रीय कारणे शोधणे आवश्यक आहे. या भूशास्त्रीय अभ्यासाचा उपयोग संबंधित भागांतील मोठ्या बांधकामांविषयी, तसेच धरणांच्या रचनेविषयी धोरण निश्चित करण्यासाठी होऊ शकतो.