- ग्रामपंचायत सदस्याने तक्रार करूनही त्याची नोंद न घेणारे निष्क्रीय प्रशासन काय कामाचे ?
- एकतर भ्रष्टाचार ग्रामपंचायत स्तरापर्यंत पोचला आहे आणि कुणी तो उघड केला, तर त्याला सकारात्मक प्रतिसादही दिला न जाणे संतापजनकच !
मालवण – तालुक्यातील देवबाग ग्रामपंचायतीने खोटे घरक्रमांक दिल्यानंतर संबंधित दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश पांडुरंग कद्रेकर २६ जानेवारीपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण करणार असून याविषयी लेखी निवेदन त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, अस्तित्वात नसलेल्या घरांना देवबाग ग्रामपंचायतीने घरक्रमांक दिले आहेत. याविषयी मी ३ डिसेबर २०२० आणि ११ जानेवारी २०२१ या दिवशी लेखी पत्रव्यवहार केला आहे; मात्र दोषींवर कारवाई न करता त्यांना पाठीशी घातले जात आहे. गत दीड मासात माझ्या तक्रारीची नोंद घेऊन तक्रारीवर कार्यवाही करण्यात आल्याविषयी माझ्याशी कोणताही पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही. त्यामुळे मी यापूर्वी दिलेल्या चेतावणीनुसार २६ जानेवारीपासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर आमरण उपोषणास बसणार आहे.
देवबाग ग्रामपंचायतीने एकाच जागेवर १५ घरक्रमांक दिले आहेत, तर दुसर्या जागेवर देण्यात आलेल्या घरक्रमांकाच्या ठिकाणी हाउस बोट उभी करून ठेवण्यात आली आहे. ग्रामपंचायतीने ७३७, ११५९, १०७३, ११५०, १०७५, १०७४, १०७२, १०७१, ११४२, ११४३, ११४४, ११४५, ११४६, ११४७, ११४८, ११४९ हे दिलेले घरक्रमांक इमारत अस्तित्वात नसतांना भूमीमालकाशी आर्थिक तडजोड करून दिले असल्याचा आरोप उपोषणकर्ते रमेश कद्रेकर यांनी केला आहे.