आरोग्य कर्मचार्‍यांच्या कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्याला प्रारंभ

पणजी, २२ जानेवारी (वार्ता.) – राज्यात आरोग्य कर्मचार्‍यांच्या कोरोना लसीकरणाच्या दुसर्‍या टप्प्याला २२ जानेवारी या दिवशी प्रारंभ झाला. ही लसीकरणाची मोहीम सलग २ दिवस ७ केंद्रांमध्ये चालणार आहे. प्रतिदिन एका केंद्रात १०० जणांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या २ दिवसांत सुमारे १ सहस्र ४०० आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. यापूर्वी १६ जानेवारी या दिवशी आरोग्य कर्मचार्‍यांसाठी कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात एकूण ४२६ आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यात आले होते.

..तर राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते ! – डॉ. शेखर साळकर

कोरोनाची लस घेणे अत्यावश्यक आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक घटत आहे. आम्ही जर लस घेत नसू आणि राज्यातील किमान निम्म्या लोकसंख्येचे पुढील २ ते ३ मासांत लसीकरण होत नसेल, तर राज्यात कोरोनाची दुसरी लाट येऊ शकते, अशी चेतावणी डॉ. शेखर साळकर यांनी दिली आहे.