७०० आरोग्य कर्मचार्यांना टोचली लस
पणजी, १६ जानेवारी (वार्ता.) – देशभरात कोविड लसीकरणाचा १६ जानेवारीला सकाळी ११ वाजता ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रारंभ केला. या वेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत गोवा वैद्यकीय महाविद्यालयातून ‘व्हर्च्युअल’ माध्यमाद्वारे सहभागी झाले होते. या वेळी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर हेही उपस्थित होते.
गोव्यातील ७ केंद्रांमधून ७०० आरोग्य कर्मचार्यांना लस देण्यात आली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या मोहिमेविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लस टोचून घेऊन या मोहिमेला सहकार्य करणारे लाभार्थी यांचे आभार मानले. ते म्हणाले, ‘‘ही स्वदेशी लस आहे. यासाठी सिरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक यांच्या शास्त्रज्ञांचे मी अभिनंदन करतो. या लसीकरणाला सहकार्य करून आणि पाठिंबा देऊन ही मोहीम यशस्वी करावी.’’ आजची लसीकरण मोहीम सर्वांसाठी आयुष्य पालटणारी घटना असेल; कारण याद्वारे आपले जनजीवन पूर्वपदावर येईल, असे गोव्याचे आरोग्य सचिव त्रिपाठी म्हणाले.
गोमेकॉचे अधिष्ठाता (डिन) डॉ. बांदेकर म्हणाले, ‘‘लसीकरण हे ऐच्छिक आहे. ज्या कुणाला लस टोचून घ्यायची असेल, त्यांनी नोंदणी करावी लागेल. २८ दिवसांच्या अंतराने लसीचे २ डोस दिले जातील. लाभार्थींना भ्रमणभाषवर निरोप (एस्एम्एस्) दिला जाईल. १८ वर्षांखालील व्यक्ती आणि गर्भवती स्त्रिया यांना या मोहिमेतून वगळण्यात आले आहे. लसीकरणानंतर प्रत्येक लाभार्थीला एक प्रमाणपत्र दिले जाईल. एखादी व्यक्ती दूरवरचा प्रवास करणार असेल, तर तिच्यासाठी हे प्रमाणपत्र महत्त्वाचे ठरणार आहे. ही लस अत्यंत सुरक्षित, तपासणी केलेली आणि प्रयोगात सिद्ध झालेली आहे. लसीकरण करणार्यांना ३ दिवस विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे.’’ हेल्थकेअर आणि मणिपाल रुग्णालयांतही लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.