स्व. मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने ‘मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सव २०२०’चे उद्घाटन

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावरील पुस्तकाचेही प्रकाशन

पणजी, १३ डिसेंबर (वार्ता.) – माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी गोव्यासाठी दिलेले योगदान कायम गोमंतकियांच्या स्मरणात रहाणार आहे. गोवा शासन स्व. पर्रीकर यांचा वारसा पुढे नेण्याचे कार्य करत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. १३ डिसेंबर या दिवशी स्व. मनोहर पर्रीकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने दोनापावला येथील ‘एन्.आय.ओ.’च्या सभागृहात आयोजित केलेल्या ‘मनोहर पर्रीकर विज्ञान महोत्सव २०२०’च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते. या महोत्सवात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘मनोहर पर्रीकर- उच्च विचारसरणी, साधी रहाणी’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. हे पुस्तक देहलीस्थित प्रसिद्ध पत्रकार नितीन गोखले यांनी लिहिले आहे, तर शासनाच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याने ते प्रसिद्ध केले आहे. या कार्यक्रमाला विज्ञान, तंत्रज्ञान आणि कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो यांचीही उपस्थिती होती.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘स्व. मनोहर पर्रीकर विज्ञाननिष्ठ होते आणि त्याचा ते समाजात प्रसार करत. या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक संशोधन करण्यावर भर देण्यासाठी शासन विविध प्रकल्प राबवणार आहे.’’ मंत्री मायकल लोबो आणि इतरांचेही या वेळी भाषण झाले. पुस्तकाचे लेखक तथा प्रसिद्ध पत्रकार नितीन गोखले म्हणाले, ‘‘स्व. मनोहर पर्रीकर हे आधुनिक गोव्याचे शिल्पकार आहेत. त्यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री पदाच्या कारकिर्दीत संरक्षण मंत्रालय आत्मनिर्भर करण्यावर भर दिला होता.’’