कर्नाटकने नियम धाब्यावर बसवून म्हादई नदीचे पाणी मलप्रभा नदीत वळवले !

कणकुंबी (कर्नाटक) येथे भेट दिल्यानंतर ‘प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा’ने केला दावा

पत्रकार परिषदेत ‘प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा’चे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते

पणजी – म्हादई पाणीतंट्याविषयी सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट असतांनाही कर्नाटक शासनाने म्हादई नदीचे पाणी वळवणे चालूच ठेवल्याचा दावा ‘प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा’ने येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत केला. म्हादईचे पाणी कर्नाटकने वळवू नये, यासाठी सातत्याने जागृती करणारे प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांच्या नेतृत्वाखाली ‘प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा’च्या शिष्टमंडळाने नुकतीच कणकुंबी (कर्नाटक) येथे म्हादईचे पात्र असलेल्या ठिकाणी भेट दिली. या भेटीच्या वेळी कर्नाटकने पाणी वळवल्याचे लक्षात आल्याचे ‘प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा’चे म्हणणे आहे. या पत्रकार परिषदेला ‘प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवा’चे नेते महेश म्हांबरे, सामाजिक कार्यकर्ते हृदयनाथ शिरोडकर, प्रा. प्रजल साखरदांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

म्हादई जलतंटा लवादाने वर्ष २०१८ मध्ये निर्णय देऊन गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांना म्हादई नदीच्या पाण्याचा वाटा निश्‍चित केला. या निर्णयाला तिन्ही राज्यांनी सर्वोच्च न्यायालयात ‘स्पेशल लिव्ह पिटिशन’ प्रविष्ट करून आव्हान दिले. हे प्रकरण न्यायालयात असतांना म्हादई नदीचे पाणी वळवून न्यायालयाचा अवमान केल्याची याचिका गोवा शासनाने कर्नाटक शासनाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात केली आहे. या पार्श्‍वभूमीवर महेश म्हांबरे पुढे म्हणाले, ‘‘कर्नाटकने सर्व नियम धाब्यावर बसवून भूमीगत कालवे खणून म्हादई नदीचे पाणी मलप्रभा खोर्‍यात वळवले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हादई प्रकरणी गोव्याचे हित जपण्यात अपयशी ठरले आहेत.’’