मालवण – तालुक्यातील धामापूर येथील श्री भगवतीदेवी मंदिराजवळ असलेल्या प्राचीन धामापूर तलावाची ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट’ म्हणून जागतिक स्तरावर निवड करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर तलावाची ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन स्ट्रक्चर अॅवॉर्ड २०२०’साठी निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून केवळ या एका तलावाची निवड झाल्याने या निवडीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
‘इंटरनॅशनल कमिशन ऑन इरिगेशन अँड ड्रेनेज’ (आय.सी.आय.डी.) द्वारे धामापूर तलावाची ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट’साठी निवड करण्यात आली. महाराष्ट्र राज्याला हा पुरस्कार पहिल्यांदाच मिळाला आहे. वर्ष २०१८ मध्ये ‘आय.सी.आय.डी.’च्या कॅनडा येथे झालेल्या ६० व्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी परिषदेमध्ये भारतातील तेलंगाणा राज्यातील २ साईट्सना वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट म्हणन पुरस्कृत केले गेले होते. सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथे होणार्या वर्ष २०२० च्या ७२ व्या आंतरराष्ट्रीय परिषदेत जगातील १४ तलावांना ‘वर्ल्ड हेरिटेज इरिगेशन साईट’ म्हणून पुरस्कृत केले जाणार आहे. यामध्ये भारतातील आंध्रप्रदेशमधील कुंबम तलाव, के.सी. कॅनल, पोरुममीला लेक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापूर तलाव या ४ तलावांना हा मान प्राप्त होणार आहे, तर चीनमधील ४, इराणमधील २, जपानमधील ३ आणि कोरियातील एका तलावाची निवड करण्यात आली आहे.