पितृपक्षात श्राद्धविधी केल्यानंतर पितरांसाठीच्या पिंडांमध्ये पुष्कळ सकारात्मक पालट होणे

२ सप्टेंबर २०२० या दिवशी ‘महालयारंभ (पितृपक्ष)’ चालू होत आहे. यानिमित्ताने…

‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी

यु.ए.एस्. उपकरणाद्वारे चाचणी करतांना श्री. आशिष सावंत

‘श्राद्ध म्हटले की, हल्लीच्या विज्ञानयुगातील तरुण पिढीच्या मनात ‘अशास्त्रीय आणि अवास्तव कर्मकांडाचे अवडंबर’, अशी त्याविषयीची चुकीची प्रतिमा उभी रहाते. पूजाअर्जा, श्राद्धपक्ष यांवर विश्‍वास न ठेवणारे किंवा ‘समाजकार्यच श्रेष्ठ आहे’, असे समजणारे, ‘पितरांसाठी श्राद्ध न करता त्याऐवजी गरिबांना अन्नदान करू किंवा शाळेला साहाय्य करू’, असे म्हणतात ! भारतीय संस्कृती असे सांगते की, ज्याप्रमाणे माता-पिता, तसेच निकटवर्तीय हयात असतांना त्यांची सेवाशुश्रूषा आपण धर्मपालन म्हणून करतो, त्याप्रमाणे त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याप्रती आपले काहीतरी कर्तव्य असते. या कर्तव्यपूर्तीची आणि त्याद्वारे पितरऋण फेडण्याची सुसंधी श्राद्धकर्मामुळे मिळते. ‘पितृपक्षात पितरांसाठी श्राद्ध केल्याचा श्राद्धविधीतील पिंडांवर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी २७.९.२०१८ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाचा उपयोग करण्यात आला. या चाचणीचे स्वरूप, केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवरण पुढे दिले आहे.

डॉ. (सौ.) नंदिनी सामंत

१. चाचणीचे स्वरूप

या चाचणीत श्राद्धविधी करण्यापूर्वी आणि केल्यानंतर या विधीतील घटक असलेल्या पिंडांच्या ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे केलेल्या मोजणीच्या नोंदी करण्यात आल्या. या केलेल्या सर्व मोजण्यांच्या नोंदींचा तुलनात्मक अभ्यास करण्यात आला.

२. पिंड म्हणजे काय ?

‘भातात तिळाचे पाणी, वडा आणि खीर घालतात. त्यानंतर भात मळून साधारणतः लिंबाएवढे गोल, न फुटतील असे, चांगले घट्ट पिंड करतात. पितृत्रयीकरता जरा मोठे पिंड करण्याची पद्धत कृतज्ञतामूलक आहे.’ (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन’)

वाचकांना सूचना : या लेखातील ‘यू.ए.एस्’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या संकेतस्थळाच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत.

३. केलेल्या मोजणीच्या नोंदी आणि त्यांचे विवेचन

३ अ. नकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन – पिंडांमध्ये नकारात्मक ऊर्जा मुळीच नसणे : पिंडांमध्ये श्राद्धविधी करण्यापूर्वी आणि केल्यानंतरही ‘इन्फ्रारेड’ आणि ‘अल्ट्राव्हायोलेट’ या नकारात्मक ऊर्जा आढळल्या नाहीत.

३ आ. सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

३ आ १. श्राद्धविधीच्या पूर्वीही पुष्कळ प्रमाणात असलेली पिंडांमधील सकारात्मक ऊर्जा श्राद्धविधीनंतर आणखी वाढणे : सर्वच व्यक्ती, वास्तू किंवा वस्तू यांमध्ये सकारात्मक ऊर्जा असतेच, असे नाही. श्राद्धविधीचा आरंभ करण्यापूर्वीही पिंडांमध्ये सकारात्मक ऊर्जा होती, हे त्यांच्या संदर्भात ‘यू.ए.’ स्कॅनरच्या भुजांनी केलेल्या १८० अंशाच्या कोनावरून लक्षात आले. त्यामुळे पिंडांमधील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळही मोजता आली. ती १.७० मीटर होती. श्राद्धविधी केल्यानंतर पिंडांमधील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २ मीटर होती, म्हणजेच त्यात ०.३० मीटर वाढ झाली.

३ इ. एकूण प्रभावळीच्या संदर्भात केलेल्या मोजणीच्या नोंदींचे विवेचन

३ इ १. श्राद्धविधीनंतर पिंडांची एकूण प्रभावळ वाढणे : सामान्य व्यक्ती किंवा वस्तू हिची एकूण प्रभावळ साधारण १ मीटर असते. श्राद्धविधी करण्यापूर्वी पिंडांची एकूण प्रभावळ २.६० मीटर होती. याचा अर्थ ती सामान्य वस्तूच्या तुलनेत पुष्कळ अधिक होती. श्राद्धविधी झाल्यानंतर पिंडांची एकूण प्रभावळ ३.६० मीटर झाली, म्हणजे त्यात १ मीटर वाढ झाली.

वरील सर्व सूत्रांविषयी अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण ‘सूत्र ४’ मध्ये दिले आहे.

४. केलेल्या मोजणीच्या नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण

४ अ. श्राद्धविधीमध्ये पिंडदानाचे (पिंडपूजेचे) असलेले महत्त्व : ‘श्राद्धविधीमध्ये पिंडदानाला (पिंडपूजेला) पुष्कळ महत्त्व आहे. पिंड भाताचा केला जातो. तांदुळाचा जेव्हा भात केला जातो, त्या वेळी त्यातील रजोगुण वाढतो. या रजोगुणी पिंडाच्या वातावरणकक्षेत मृतात्म्याच्या लिंगदेहाला प्रवेश करणे सोपे गेल्याने मंत्रोच्चारणाने भारलेल्या वायुमंडलाचा त्याला लाभ होऊन सूक्ष्म बळ प्राप्त झाल्याने पुढची मार्गक्रमणा करणे सोपे जाते.’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्धातील कृतींमागील अध्यात्मशास्त्र’)

४ आ. श्राद्धविधीमुळे पितरांच्या लिंगदेहाभोवती सुरक्षाकवच निर्माण होऊन त्याला पुढची गती मिळण्यास साहाय्य होणे : ‘श्राद्धाच्या मंत्रांनी निर्माण होणार्‍या लहरी, ब्राह्मणांचे आशीर्वाद, नातेवाइकांच्या सदिच्छा आणि पिंडदान यांसारख्या कर्मकांडाच्या विधींनी अलौकिक परिणाम होतात. यामुळे पितरांच्या लिंगदेहाभोवती सुरक्षाकवच निर्माण होऊन, त्याला पुढची गती मिळण्यास साहाय्य होते. नरक, भुवर्, पितृलोक आणि स्वर्ग यांत या विधींचे लाभ होतात.

४ इ. पितृपक्षात पितरांचे महालय श्राद्ध केले असता, ते संतुष्ट होऊन वर्षभर तृप्त रहातात, तसेच त्यांचे कुटुंबियांना आशीर्वाद लाभतात.’

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्धाचे महत्त्व आणि शास्त्रीय विवेचन’)

४ ई. श्राद्धविधी केल्यानंतर पितरांचा आशीर्वाद लाभल्यामुळे पिंडांमधील सकारात्मक ऊर्जा आणि पिंडांची एकूण प्रभावळ वाढणे :  सूत्र ‘४ अ ते ४ इ’ यांमधून श्राद्धविधी आणि पिंडदान (पिंडपूजन) यांचे महत्त्व लक्षात येते. श्राद्धविधी केल्यानंतर पिंडांच्या केलेल्या मोजणीच्या नोंदींमध्ये पिंडांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आणि त्यांची एकूण प्रभावळ वाढल्याचे आढळले. याचा अर्थ श्राद्धविधीमुळे पिंड सकारात्मक ऊर्जेने भारित झाले. श्राद्धापूर्वीची मोजणी दुपारी ३.५० वाजता केली होती, तर नंतरची रात्री ८.१५ वाजता केली होती. या साडेचार घंट्यांच्या कालावधीत पिंड तसे शिळे झाले होते. पिंड भातापासून बनवलेले असतात. ताजे अन्न सात्त्विक असते. अन्न जसे शिळे होत जाईल, तशी त्यातील सात्त्विकता न्यून होत जाते. त्यामुळे साडेचार घंट्यांचा वेळ उलटल्यावर पिंडांमधील सकारात्मक ऊर्जा आणि त्यांची प्रभावळ न्यून होणे अपेक्षित होते; पण तसे न होता, त्यांतील सकारात्मक ऊर्जा आणि त्यांची प्रभावळ वाढणे, हे श्राद्धविधीमुळे पिंडांवर सकारात्मक परिणाम झाल्याचे स्पष्ट करते. पिंडांवर झालेला हा सकारात्मक परिणाम श्राद्धविधीमुळे पितरांचा आशीर्वाद लाभल्यामुळे झाला, हे लक्षात येते.

४ उ. श्राद्धविधी परिणामकारक होण्यामध्ये साहाय्यभूत असलेले इतर घटक

१. श्राद्ध सनातनच्या आश्रमातील सात्त्विक वातावरणात झाले.

२. श्राद्धविधी करणारे पुरोहित श्री. दामोदर वझेगुरुजी साधना करत असून त्यांची आध्यात्मिक पातळी (टीप) ६१ टक्के आहे.

टीप – ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे महत्त्व ! : ‘ईश्‍वराची आध्यात्मिक पातळी जर १०० टक्के मानली आणि निर्जीव वस्तूंची १ टक्का मानली, तर सर्वसाधारण मनुष्याची आध्यात्मिक पातळी २० टक्के असते. या पातळीची व्यक्ती केवळ स्वतःच्या सुख-दुःखाचा विचार करते. समाजाशी तिचे काही देणे-घेणे नसते आणि ‘मीच सर्व करते’, असा तिचा विचार असतो. आध्यात्मिक पातळी ३० टक्के होते, तेव्हा ती ईश्‍वराचे अस्तित्व थोड्या प्रमाणात मान्य करू लागते, तसेच साधना आणि सेवा करू लागते. मायेची आणि ईश्‍वरप्राप्तीची ओढ सारखीच झाली की, व्यक्तीची आध्यात्मिक पातळी ५० टक्के होते. आध्यात्मिक पातळी जेव्हा ६० टक्के होते, तेव्हा ती व्यक्ती मायेपासून अलिप्त होऊ लागते. तिच्या मनोलयाला आरंभ होतो आणि तिला विश्‍वमनातील विचार ग्रहण होऊ लागतात. मृत्यूनंतर ती जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून सुटून तिला महर्लोकात स्थान प्राप्त होते.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले

३. श्राद्धाचे यजमान श्री. आदित्य कासकर हे सनातनचे पूर्णवेळ साधक आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून श्राद्धविधी भावपूर्ण झाला.

वरील सर्व सूत्रांमुळे श्राद्धविधीनंतर पिंडांच्या सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ आणि त्यांची एकूण प्रभावळ यांमध्ये वाढ झालेली आढळली. या वैज्ञानिक प्रयोगावरून श्राद्धविधी हा थोतांड नसून त्यामध्ये अध्यात्मशास्त्र आहे, हे सिद्ध होते.’

– आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा  (२.१०.२०१८)

ई-मेल : [email protected]