सागाच्या झाडाची तस्करी करणार्‍या २ जणांना न्यायालयीन कोठडी

सागाची झाडे

सावंतवाडी – सावंतवाडी वन परिक्षेत्रातील चराठे येथील शासकीय वनातून सागाच्या झाडाची अवैधरित्या तस्करी करणार्‍या २ सख्ख्या भावांना वन विभागाच्या पथकाने २४ मे या दिवशी अटक केली. २५ मे या दिवशी न्यायालयाने या दोघांना १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी बजावली आहे. या गुन्ह्यातील तिसर्‍या आरोपीचा शोध वन विभाग घेत आहे.

२४ मे या दिवशी चराठे येथील शासकीय वनातील झाडे तोडून त्याची तस्करी करण्याच्या प्रयत्नात काही जण असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानंतर या परिसरात वन विभागाच्या पथकाने सापळा रचला. रात्री एका मालवाहू वाहनाचा संशय आल्याने वन कर्मचार्‍यांनी ते वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला; मात्र चालकाने वाहन न थांबवता पळून जाण्याचा प्रयत्न केला असता वन विभागाच्या पथकाने पाठलाग करून वाहन चराठे येथेच कह्यात घेतले. वाहनाची पडताळणी केली असता त्यात तोडलेले सागाचे लाकूड आढळले. हे वाहन भानुदास दत्ताराम देसाई (हरसावंतवाडा, माजगाव) यांच्या मालकीचे असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी भानुदास दत्ताराम देसाई आणि त्याचा भाऊ भूषण दत्ताराम देसाई यांना कह्यात घेण्यात आले. भूषण याच्या घरात सागाच्या लाकडापासून बनवलेला १ सोफासेट, २ खुर्च्या, टिपॉय, सागाचे ६ गोल नग आणि चिरलेले लाकूड असे साहित्य सापडले असून सर्व साहित्य वन विभागाने कह्यात घेतले आहे.