पवना नदीपात्रात जनावरांचे मांस आणि प्लास्टिक पिशव्यांचा खच !

पिंपरी (जिल्हा पुणे) – पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा होणार्‍या पुनावळे येथील पवना नदीवरील राममंदिर घाटाजवळ नुकताच जनावराचे मांस आणि प्लास्टिक पिशव्यांचा खच आढळला. मांसविक्रेते जनावरांचे उरलेले मांस, चरबी थेट पुनावळे गावातील पुलावरून नदीत टाकत असल्याची तक्रार महापालिकेकडे आली होती. त्या पार्श्वभूमीवर उपद्रव शोधपथकाने पहाणी केली असता पुनावळे येथील पवना नदीवरील राममंदिर दशक्रिया घाटाजवळ जनावरांचे मांस असलेल्या १२ पिशव्या आढळून आल्या. (आता कुठे आहेत अंनिसवाले आणि पर्यावरणवादी ? – संपादक) महापालिकेच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे उपअभियंता पंकज धेंडे यांनी या प्रकरणी रावेत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (पवना नदीच्या पवित्र घाटावर मांसाचा खच आढळणे, हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे. नदीचे प्रदूषण करून जनतेला विषारी पाणी पाजणार्‍या समाजकंटकांना कठोर शिक्षा करायला हवी. – संपादक)

महापालिकेच्या ‘उपद्रव शोधपथका’च्या वतीने नदी परिसरात गस्त घातली जात आहे. वेळोवेळी दंडात्मक कारवाई केली जात असतांनाही २३ एप्रिल या दिवशी नदीपात्रात मांस भरलेल्या ३० पिशव्या आढळून आल्या. (प्रशासनाने केवळ गस्त न घालता कायमस्वरूपी उपाययोजना करून पवना नदीला प्रदूषण मुक्त करावे, हीच अपेक्षा ! – संपादक)