Dr. Munna Kumar Sharma : भारताला घटनात्मकदृष्ट्या ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा : हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुन्ना कुमार शर्मा यांची मागणी !

आग्रा येथे ‘अखंड हिंदु राष्ट्र संमेलना’चे भव्य आयोजन !

डॉ. मुन्ना कुमार शर्मा

आग्रा (उत्तरप्रदेश) – भारताला घटनात्मकदृष्ट्या ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करा, अशी मागणी अखिल भारत हिंदु महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुन्ना कुमार शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

अखिल भारत हिंदु महासभेच्या आग्रा जिल्हा घटकाच्या वतीने आयोजित ‘अखंड हिंदु राष्ट्र संमेलना’त ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यासह देशात समान नागरी कायदा लागू करणे, गोहत्येवर राष्ट्रीय स्तरावर बंदी घालणे, लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू करणे, मंदिर अधिग्रहण कायदा रहित करणे इत्यादी मागण्याही त्यांनी केल्या. श्री. शर्मा यांनी ‘लव्ह जिहाद’आणि ‘लँड जिहाद’ करणार्‍यांना शासन करण्यासाठी सशक्त कायदा करण्याची, तसेच देशातील हिंदु संत, गोरक्षक अन् हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी यांना संरक्षण देण्याची मागणीही केली.

या वेळी शर्मा म्हणाले, ‘‘अखिल भारत हिंदु महासभा भारताला ‘हिंदु राष्ट्र’ बनवण्यासाठी कटीबद्ध असून याच उद्देशाने देशभर हिंदु संमेलनांचे आयोजन केले जात आहे. राजकारणाचे हिंदुकरण आणि हिंदूंचे सैनिकीकरण करणे, ही काळाची आवश्यकता आहे. आपल्याला भारताला पुन्हा ‘विश्वगुरु’ बनवायचे आहे.’’