वर्ष २०२६-२७ मध्ये सुधारित अभ्यासक्रमानुसार ‘बालभारती’ पुस्तके प्रकाशित करणार !

दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी इयत्तांसाठी नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके खरेदी करण्याचे आवाहन

पुणे – ‘महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ’ (बालभारती)च्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये इयत्ता दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावी यांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित होणार आहेत. त्यामुळे पालकांनी ही नवीन अभ्यासक्रमाची पुस्तके खरेदी करावीत, असे बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी सांगितले. बालभारतीची कोणती पुस्तके घ्यावीत ? आणि कोणती घेऊ नयेत ? यासंदर्भात बालभारतीने पत्रक प्रसिद्ध केले आहे.

पाचवी, सातवी, नववी आणि अकरावी या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांचे हे शेवटचे वर्ष असणार आहे. त्यामुळे या इयत्तांच्या पाठ्यपुस्तकांची खरेदी आवश्यकतेनुसार करावी अशा सूचनाही बालभारतीने संबंधितांना दिल्या आहेत.

१. इयत्ता नववी ते बारावीसाठी विषय योजना आणि मूल्यमापन योजना यांनुसार विद्यार्थ्यांनी बालभारतीने सिद्ध केलेल्या प्रात्यक्षिक नोंदवहीचा वापर करणे बंधनकारक राहील. कोणत्याही शैक्षणिक संस्थेने खासगी प्रकाशकांच्या प्रात्यक्षिक नोंदवहीचा वापर करण्याची सक्ती करू नये, असे बालभारतीने स्पष्ट केले आहे.

२. मराठी आणि इंग्रजी माध्यमातील इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांच्या स्वाध्याय पुस्तिकांची निर्मिती केली आहे. या स्वाध्याय पुस्तिकांच्या खरेदीवर ४० टक्के सवलत आहे.