सनातन धर्म आणि भारतीय संस्कृती यांची माहिती तरुणांपर्यंत पोचणे आवश्यक ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी – आजच्या तरुण पिढीला आपल्या मूळ सनातन धर्माची आणि भारतीय संस्कृतीची ओळख असणे आवश्यक आहे. ही संस्कृती त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. जुने गोवे येथे कला आणि संस्कृती विभागाच्या वतीने आयोजित ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व २०२६’ या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले.

या वेळी त्यांनी ‘तरुण पिढी आणि भारतीय वारसा’ या विषयावर त्यांचे विचार मांडले. या सोहळ्याला केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार राजेश फळदेसाई, सांस्कृतिक विभागाचे संचालक विवेक नाईक आणि जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्य महाराज पिठाचे प्रतिनिधी उपस्थित होते. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चालू केलेल्या ‘सोमनाथ पर्वा’मुळे देशभर सनातन धर्माचा प्रसार होईल’, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 

१. भाजप सरकारच्या काळात देशात आणि राज्यात धार्मिक स्थळांचा विकास झाला आहे. अयोध्येत श्रीराममंदिर उभारले. गोव्यातील सरकारनेही वेर्णे येथील म्हालसा नारायणीदेवी मंदिर उभारले.

२. पूर्वी पर्यटक जुन्या गोव्यात केवळ चर्च पहाण्यासाठी येत असत; मात्र आता तेथील मंदिरांकडे, विशेषतः गोवेश्वर मंदिराकडे (जिथे १२ ज्योतिर्लिंगे आहेत) पर्यटकांचा ओघ वाढत आहे, ही समाधानाची गोष्ट आहे.

३. पोर्तुगिजांच्या काळात उद्ध्वस्त झालेल्या मंदिरांच्या स्मृती जपण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे.

४. आगामी पिढीला सनातन धर्म आणि भारतीय संस्कृती यांचे महत्त्व समजावून देण्यासाठी ‘सोमनाथ पर्व’सारखे कार्यक्रम महत्त्वाचे आहेत. अशा उपक्रमांमुळे तरुण पिढीला आपल्या परंपरा, संस्कृती आणि धार्मिक वारसा यांची ओळख होते.

दिवाडी बेटावर मंदिर उभारणार ! 

पोर्तुगिजांनी गोव्यातील सनातन धर्मावर आक्रमण केले. लोक एकत्र येऊ नयेत आणि त्यांनी त्यांच्या धर्माचे पालन करू नये, यासाठी पोर्तुगिजांनी सहस्रो मंदिरे उद्ध्वस्त केली. आपला देव आणि धर्म वाचवण्यासाठी अनेक गोमंतकियांना अन्यत्र स्थलांतर करावे लागले. पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची आठवण म्हणून सरकार दिवाडी बेटावरील ‘कोटी तीर्थ’ येथे एक मंदिर बांधणार आहे. याचे काम लवकरच चालू होणार आहे. सप्तकोटेश्वर मंदिराचे नूतनीकरण करण्याचे कामही आमच्या भाजप सरकारच्याच कार्यकाळात झाले.