सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘माझ्या राष्ट्र आणि धर्म विषयक विचारांत होत गेलेला पालट’ या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे लिखाण

‘माझ्या राष्ट्र आणि धर्म विषयक विचारांत होत गेलेला पालट

अ. राष्ट्र आणि धर्म यांची स्थिती कितीही वाईट असली, तरी ‘सर्व ईश्वरेच्छेनेच घडते’, हा विचार मनात बिंबलेला असल्याने परिस्थितीकडे साक्षीभावाने पहाणे होत असे.

आ. स्वतः ईश्वर अवतार घेऊन कार्य करतो, तर आपणही करता येईल ते कार्य केले पाहिजे.

इ. ‘आ’ तील विचार ‘अ’ तील विचाराच्या विरुद्ध आहे, म्हणजे ‘मी ईश्वरेच्छा आणि साक्षीभाव’ हे शब्द विसरून स्वतःच्या बुद्धीने विचार करायला लागलो आहे’, असे मला वाटले.

ई. वरील विचार ‘माझा स्वतःचा आहे कि ईश्वराने मनात घातला आहे’, असा प्रश्न मनात आला.

उ. ईश्वर स्वतः कार्य करत असल्याने त्याच्याशी एकरूप होण्यासाठी आपणही करता येईल तेवढे कार्य केले पाहिजे.

सध्या येथपर्यंत आल्यावर विचारमालिका थांबली आहे.’

(चैत्र शु. ४, कलियुग वर्ष ५११३ (७.४.२०११))

२. वरील विचारांचे श्री. राम होनप यांनी केलेले अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !

२ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या पालटत गेलेल्या आध्यात्मिक अवस्था

श्री. राम होनप

२ अ १. राष्ट्र आणि धर्म यांच्या बिकट परिस्थितीकडे साक्षीभावाने पहाणे : ‘संतांना उच्च आध्यात्मिक पातळीमुळे ‘एक ईश्वर सत्य असून अन्य सर्वकाही माया आहे’, याची जाणीव झालेली असते. संतांना ‘सर्वकाही ईश्वरेच्छेने घडत आहे’, याचे ज्ञान असते. त्यामुळे त्यांना कुठल्याही परिस्थितीत पालट करण्याची इच्छा होत नाही. या आध्यात्मिक स्थितीमुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना राष्ट्र आणि धर्म यांच्या बिकट स्थितीकडे तटस्थपणे पहाता येत होते.

२ अ २. ‘स्वतः ईश्वर अवतार घेऊन कार्य करतो, तर आपल्यालाही करता येईल ते कार्य केले पाहिजे’, असा विचार सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मनात येणे’, याचे कारण : सत्त्वगुणामुळे पृथ्वीवर शांतता आणि स्थैर्य असते. रजोगुणामुळे मायेचे कार्य वाढते आणि तमोगुणामुळे वाईट घटनांमध्ये वाढ होते अन् धर्माचे कार्य न्यून होऊन अधर्माचे कार्य वाढू लागते. काळानुरूप त्रिगुणांमध्ये पालट होत जातो, तसतसे पृथ्वीवर चांगली आणि वाईट परिस्थिती निर्माण होते. हे सर्व मायेचे कार्य असते. या कार्यात ईश्वर हस्तक्षेप न करता तटस्थपणे पहात असतो. जेव्हा प्रतिकूल परिस्थितीचा साधकांना त्रास होतो, तेव्हा ईश्वर त्यात हस्तक्षेप करतो अन् साधकांचे रक्षण करतो; कारण ईश्वर भक्तवत्सल आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना प्रथम राष्ट्र आणि धर्म यांच्या बिकट स्थितीकडे तटस्थपणे पहाता येत होते. त्यांची आध्यात्मिक पातळी पुढे आणखी वाढल्यावर त्यांच्यातील अवतारत्व जागृत झाले. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या मनात ‘स्वतः ईश्वर अवतार घेऊन कार्य करतो, तर आपल्यालाही करता येईल ते कार्य केले पाहिजे’, असा विचार आला.

२ आ. ‘पालटलेला विचार स्वतःचा आहे कि ईश्वराने मनात घातला आहे ?’, असा प्रश्न सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मनात निर्माण होणे आणि त्याचे कारण : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या मनात प्रथम ‘राष्ट्र आणि धर्म यांच्या बिकट स्थितीकडे तटस्थपणे पहाणे’ आणि त्यानंतर ‘स्वतः ईश्वर अवतार घेऊन कार्य करतो, तर आपल्यालाही करता येईल ते कार्य केले पाहिजे’, असा विचार आला. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांतील अवतारत्व जागृत झाले, तरी त्यांच्यात कुठलाही कर्तेपणा नाही. त्यांच्यातील अहंशून्य अवस्थेमुळे ‘पालटलेला विचार स्वतःचा आहे कि ईश्वराने मनात घातला आहे ?’, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण झाला.

२ इ. मनातील विचारमालिका थांबण्याचे कारण : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ईश्वरप्राप्ती साध्य केली आहे. त्यांचे जीवन ईश्वरमय असून त्यांचे अवतारी कार्य चालू आहे. त्यामुळे त्यांच्या मनातील विचारमालिका थांबली आहे.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातील ज्ञानप्राप्तकर्ता साधक), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक : २.२.२०२६, वेळ : सकाळी ११ आणि कालावधी : २० सेकंद)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना / संतांना / धर्मप्रेमींना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. - संपादक