म्हापसा आणि दोनापावला येथील दरोड्याचे प्रकरण

पणजी, १ मे (वार्ता.) – म्हापसा आणि दोनापावला येथील दरोड्याच्या प्रकरणी कह्यात घेण्यात आलेल्या बांगलादेशी दरोडेखोर टोळीतील सदस्य दरोड्यापूर्वी संबंधित भागाची ‘रेकी’ (चोरीच्या दृष्टीने अभ्यास) करत होते. संबंधित भागातील लोक कधी झोपतात आणि कधी उठतात, याचा अभ्यास करत होते. यामुळे लोक अल्प संख्येने सक्रीय असलेल्या भागात आणि अल्प सक्रीय असलेल्या वेळेत दरोडा घालण्यात येत होता. त्याचप्रमाणे ‘दरोडा घाला, बांगलादेशात पळून जा आणि पुन्हा येऊन दरोडा घाला’ या तत्त्वानुसार बांगलादेशी दरोडेखोर टोळी देशभरात सक्रीय होती, अशी माहिती गुन्हे अन्वेषण खात्याचे अधीक्षक राहुल गुप्ता यांनी १ मे या दिवशी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी पोलीस महासंचालक आलोक कुमार आणि अन्य अधिकारी यांची उपस्थिती होती.
नदीम खान यापूर्वी फोंडा येथील एटीएम्मधील पैशांच्या चोरीच्या प्रकरणी होता कह्यात
पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता पुढे म्हणाले, ‘‘म्हापसा आणि दोनापावला येथील दरोड्याच्या प्रकरणी गोवा पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांना कह्यात घेतले आहे. दरोड्यासंबंधी प्राथमिक अन्वेषणाला प्रारंभ झाला आहे. यामधील एक आरोपी नदीम खान याला यापूर्वी वर्ष २०२२ मध्ये फोंडा येथील एटीएम्मधील पैशांच्या चोरीच्या प्रकरणी कह्यात घेण्यात आले होते. त्याने कोलवाळ कारागृहात असतांना स्वतःचे जाळे सिद्ध केले होते. टोळीतील अन्य सदस्यांना गोव्याविषयी माहिती देण्याचे काम आरोपी नदीम खान यानेच केले. दोनापावला प्रकरणात आरोपी नदीम खान याला कळंगुट येथे रहाणारा मेहमूद (मूळचा उत्तरप्रदेश) याने साहाय्य केले. या प्रकरणी मेहमूद यालाही कह्यात घेण्यात आले आहे. आरोपी सैफुल हा बेंगळुरू येथे काही काळ रहात होता. त्याला साहाय्य करणारा राजू बी आणि सफीकुल यांनाही कह्यात घेण्यात आले आहे.
टोळीची दरोडा घालण्याची पद्धत !
बांगलादेशी टोळीचे सदस्य रेकी करतांना २-३ गटांमध्ये फिरत असत. दिवसभर रेकी करून संध्याकाळी ते एकत्र येऊन एकमेकांना माहिती देत असत. ज्या घराच्या जवळपास सीसीटीव्ही नसेल, असेच घर ते दरोडा घालण्यासाठी निवडत असत. त्यांनी स्थानिक बाजारातून हातोडी, सुरी आदी हत्यारे मिळवली होती. ही हत्यारे कुणी पुरवली याचे अन्वेषण सध्या चालू आहे. ही टोळी प्रत्येक ६ महिन्यांनी बांगलादेशामधून भारतात येऊन विविध राज्यांत दरोडे टाकत होती. ही टोळी गोव्यात दरोडा घातल्यानंतर मेघालयमार्गे बांगलादेशात पोचली, तसेच परत भारतात येण्यासाठी देखील मेघालय मार्गाचा वापर करण्यात आला. गोवा पोलिसांनी ही दोन्ही प्रकरणे गंभीरपणे घेतली आहेत. दरोडा पडल्यानंतर २४ घंट्यांमध्ये आम्हाला आरोपींची ओळख पटली होती; मात्र हैदराबाद येथे सीसीटीव्ही फूटेज (चित्रीकरण) न मिळाल्याने ते आमच्या हातातून थोडक्यात निसटले.’’
बांगलादेशी दरोडेखोर टोळीने २० एप्रिल २०२५ या दिवशी दोनापावला येथे, तर ७ ऑक्टोबर २०२५ या दिवशी म्हापसा येथे दरोडा घालून लाखो रुपयांचा ऐवज लुटला होता. बांगलादेशी टोळीतील सदस्यांना एप्रिल २०२६ मध्ये देहली पोलिसांनी कह्यात घेतले होते. या टोळीतील सदस्यांना ३० एप्रिल २०२६ या दिवशी पुढील अन्वेषणासाठी गोव्यात आणले आहे.
गोवा पोलिसांचा चांगला समन्वय ! – पोलीस महासंचालक
या वेळी पोलीस महासंचालक आलोक कुमार म्हणाले, ‘‘या दोन्ही प्रकरणांत गोवा पोलिसांनी सीमा सुरक्षा दल, तसेच बंगाल, आंध्रप्रदेश, तेलंगाणा आणि देहली या राज्यांतील पोलिसांसमवेत चांगला समन्वय ठेवला होता. यामुळे आरोपींना पकडणे शक्य झाले. ही टोळी वर्ष २०१० पासून देशातील विविध राज्यांत गुन्हे करत होती.’’
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !