रियाज काझी याच्या संस्थांना अमेरिका आणि युरोप येथून निधी प्राप्त !

  • नागपूर येथे रियाज काझी याने धर्मांतरासाठी दबाव आणल्याचे प्रकरण

  • संस्थेच्या संचालक मंडळातील अधिवक्ता सलमान अहमद यांनी आरोप फेटाळले !

रियाज काझी

नागपूर – येथील ‘युनिव्हर्सल मल्टिपर्पज सोसायटी’ आणि ‘फिक्र’ या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक अन् शैक्षणिक उपक्रम राबवले जात असल्याचे वरकरणी दिसत होते; पण या संस्थांना अमेरिकेसह युरोपमधून ‘जकात’च्या नावाखाली मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याची माहिती प्राथमिक अन्वेषणात मिळाली आहे. या निधीचा वापर धर्मांतरासाठी झाला का ?, याची चौकशी पोलीस करत आहेत. या संस्थांचा प्रमुख रियाज काझी याने महिलांवर इस्लामच्या पालनासाठी दबाव आणला होता, तसेच त्यांच्याशी अयोग्य वर्तन केले होते. त्याच्या विरोधात अशा स्वरूपाच्या तक्रारी प्रविष्ट (दाखल) करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी काझी अटकेत आहे.

संस्थेची धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी, आर्थिक लेखापरीक्षण, तसेच निधीचा वापर यांप्रकरणी सखोल अन्वेषण चालू आहे.

संस्थेच्या संचालक मंडळातील अधिवक्ता सलमान अहमद यांनी सर्व आरोप फेटाळून लावले असून ‘ही तक्रार शिस्तभंग कारवाईनंतर सूडभावनेतून केली आहे’, असे म्हटले. ‘संबंधित महिलांनीच संस्थेच्या नियमांचे उल्लंघन केले होते; म्हणून त्यांना नोटीस देण्यात आली होती’, असेही त्यांनी सांगितले .

संपादकीय भूमिका

जर हा निधी धर्मांतराच्या कार्यासाठी वापरला गेल्याचे उघड झाले, तर अशा संस्थांवर बंदी घातली पाहिजे !