विद्यार्थ्यांचे ‘डिजिटल व्यसन’ रोखण्यासाठी ‘स्क्रीन टाईम’वर निर्बंध घाला !

हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे मागणी

डावीकडून अधिवक्ता रूपेश गावस आणि श्री. प्रमोद नाणोस्कर

पणजी, २ एप्रिल – विद्यार्थ्यांमधील वाढते ‘डिजिटल व्यसन’ रोखण्यासाठी गोव्यात कर्नाटक राज्याच्या धर्तीवर ‘स्क्रीन टाईम’वर निर्बंध घालावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने हे निवेदन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सादर केले आहे. या शिष्टमंडळामध्ये अधिवक्ता रूपेश गावस आणि श्री. प्रमोद नाणोस्कर यांची उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांमधील डिजिटल व्यसनाच्या वाढत्या समस्येला आळा घालण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने गोवा सरकारकडे पुढील मागण्या केल्या आहेत.

१. विद्यार्थ्यांच्या हितासाठी विद्यार्थ्यांना ‘डिजिटल’ वापरासंबंधी धोरण सिद्ध करणे

२. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाव्यतिरिक्त ‘स्क्रीन टाईम’ प्रतिदिन १ घंटा मर्यादित ठेवणे आणि संध्याकाळी ७ नंतर इंटरनेट वापरावर बंदी घालणे

३. प्रत्येक शाळेने स्वतःचे ‘डिजिटल वापर धोरण’ सिद्ध करणे

४. इंटरनेटच्या अतीवापरामुळे उद्भवणारी चिंता, झोपेची कमतरता आणि एकाग्रतेचा अभाव यांसारख्या समस्यांसाठी शाळांमध्ये सक्षम समुपदेशन व्यवस्था उपलब्ध करणे

५. विद्यार्थ्यांना सायबर बुलिंग (सामाजिक माध्यम, गेम्स यांद्वारे त्रास देणे, धमकावणे, अवमानित करणे), गोपनीयता आणि दायित्वपूर्ण ऑनलाईन वर्तन यांबद्दल शिक्षण देणे

६. १६ वर्षांखालील मुलांच्या सामाजिक माध्यमांच्या वापरावर कडक नियमावली सिद्ध करणे आणि घरात ‘नो-फोन झोन’ (भ्रमणभाष वापरण्यास बंदी असलेले क्षेत्र) सिद्ध करणे

७. मुलांच्या डिजिटल वर्तनावर लक्ष ठेवण्यासाठी पालक आणि शिक्षक यांना प्रशिक्षित करणे.

गोवा सरकारनेही १६ वर्षांखालील मुलांच्या ‘सामाजिक माध्यमा’च्या वापरावर बंदी घालण्याचा विचार चालवला आहे आणि या प्रस्तावाचा विचार करण्यासाठी एक समिती नेमली आहे. गोवा सरकारचा हा एक स्तुत्य निर्णय आहे आणि ‘स्क्रीन टाईम’वर निर्बंध घालण्याच्या मागणीची गोवा सरकार पूर्तता करेल, अशी आशा हिंदु जनजागृती समितीने व्यक्त केली आहे.