क्रांतीकारकांच्या प्रदर्शनाद्वारे वडाळा (मुंबई) येथील तीन शाळांमधील ३ सहस्र विद्यार्थ्यांमध्ये जागृती !

प्रदर्शन पहातांना विद्यार्थी

वडाळा (मुंबई) – येथील राष्ट्रीय कन्नड शिक्षण संस्था महाविद्यालय, आंध्र हायस्कूल आणि साऊथ इंडियन वेलफेअर सोसायटी या विद्यालयांमध्ये हिंदु जनजागृती समितीच्या वतीने क्रांतीकारकांचे (फ्लेक्स) प्रदर्शन लावण्यात आले होते. या प्रदर्शनाचा लाभ ३ सहस्रांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला. सर्व विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने प्रदर्शन पाहिले. विद्यार्थी आणि शिक्षक यांचा त्याला उत्तम प्रतिसाद लाभला.

राष्ट्रीय कन्नड शिक्षण संस्था महाविद्यालय आणि वडाळा राष्ट्रीय कन्नड शिक्षण संस्था महाविद्यालय

येथे लावलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. नेहा तिवारी, प्रा. श्री. सुनील मांगले, प्रा. सुरेश राव, प्रा. (सौ.) सविता लोके, तसेच हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. मुख्याध्यापिका सौ. नेहा तिवारी यांनी या वेळी दीपप्रज्वलनाचे महत्व सांगितले. विद्यार्थ्यांनी क्रांतीकारकांच्या गुणांचा अभ्यास करून ते आपल्यामध्ये विकसित करण्याचे आवाहन त्यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. पार्थ सारथी नायक आणि विश्वस्त श्री. शशिकांत जोशी यांनीही प्रदर्शनास भेट दिली. ‘या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल’, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. या महाविद्यालयातील ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला.

साऊथ इंडियन वेलफेअर सोसायटी, वडाळा

साऊथ इंडियन वेलफेअर सोसायटीच्या प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. श्रीदेवी बागायतकर यांच्या सहकार्याने प्रदर्शन लावण्यात आले. या प्रदर्शनाचा एकूण १ सहस्र ८५० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.

अभिप्राय 

१. सौ. श्रीदेवी बागायतकर, मुख्याध्यापिका, प्राथमिक विभाग – चांगले प्रदर्शन आहे. यातील काही क्रांतीकारकांची माहिती आम्हालाही नव्हती. ती माहिती प्रदर्शनामुळे समजली.

२. सौ. विनया कामत, शिक्षिका – विद्यार्थी हे प्रदर्शन पहाण्यास उत्सुक होते.

अभिप्राय !

१. श्री. पुरुषोत्तम पाटील, प्रबंधक, सर एम्. विश्वेश्वरय्या व्यवस्थापन अभ्यास आणि संशोधन संस्था, वडाळा – आताच्या पिढीला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बलीदान दिलेल्या क्रांतिकारकांचा इतिहास समजणे अत्यंत आवश्यक आहे. अशा प्रदर्शनांमुळे विद्यार्थ्यांना देशभक्तीची प्रेरणा मिळते.

२. श्री. सुनील मांगले, साहाय्यक प्राध्यापक – क्रांतीकारकांच्या प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. काही अपरिचित क्रांतीकारकांविषयी माहिती मिळाली.

३. कु. लतिका मखवाना, विद्यार्थिनी – क्रांतीकारकांविषयी सविस्तर माहिती मिळाल्यावर अंगावर रोमांच आले. प्रत्येक विद्यार्थ्याने हे प्रदर्शन पहायला हवे.

आंध्र हायस्कूल, वडाळा

येथील प्रदर्शनासाठी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ललिता गद्दे, सेकंडरी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पद्मा वेतूरी यांचे सहकार्य लाभले. मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांना स्वातंत्र्यसैनिक अन् क्रांतीकारक यांच्याविषयी माहिती मिळावी, या उद्देशाने प्रयत्न केले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि माहिती जाणून घेतली. या प्रदर्शनाचा ५५० हून अधिक विद्यार्थ्यांनी लाभ घेतला.