(म्हणे) ‘पुण्यात वारकरी आणि धारकरी एकमेकांशी भिडले !’ – दैनिक ‘पुढारी’

  • दैनिक ‘पुढारी’कडून भक्ती-शक्ती संगमाविषयी चुकीचे वृत्त !

  • नंतर केली क्षमायाचना !

पुणे, २२ जून (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून अखंडपणे चालू असलेल्या आषाढी वारीतील पुणे येथील ‘भक्ती आणि शक्ती यांच्या संगमा’ची परंपरा ! यंदाच्या वारीतही २० जून या दिवशी या परंपरेचे दर्शन घडले. येथील बंकीमचंद्र चट्टोपाध्याय मार्गावर संचेती रुग्णालय येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर माऊली आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांना ‘श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान’चे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या नेतृत्वाखाली सहस्रावधी धारकर्‍यांनी अभिवादन केले. मात्र याविषयी दैनिक ‘पुढारी’ने चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले.

‘पुढारी’च्या पुणे आवृत्तीमध्ये २१ जूनच्या अंकात ‘भिडे गुरुजींनी घेतला संत तुकाराम महाराज पालखी रथाचा ताबा’, असे अत्यंत चुकीचे वृत्त प्रसिद्ध केले. यामध्ये ‘वारकरी आणि धारकरी एकमेकांशी भिडले’, ‘भिडेगुरुजी यांनी अचानक संत तुकाराम महाराज पालखी रथाचा ताबा घेतला’, ‘भिडेगुरुजी आणि कार्यकर्त्यांनी पोलिसांचा बंदोबस्त झुगारून पालखी रथाचा ताबा घेतल्याने खळबळ उडाली’, ‘या घटनेमुळे वारकरी आणि धारकरी यांच्यात झटापट झाली’, ‘पोलिसांनी भिडेगुरुजी यांना रोखण्याचा प्रयत्न केला’, असा पत्रकारितेला काळीमा फासणारा अत्यंत खोटा उल्लेख बातमीत करण्यात आला आहे. ‘अशी कोणतीही घटना येथे घडली नाही. हे वृत्त अनावधानाने प्रसिद्ध करण्यात आले’, असे नमूद करत २२ जूनच्या अंकामध्ये या वृत्ताविषयी दैनिक ‘पुढारी’मधून क्षमा मागण्यात आली आहे.

संत ज्ञानेश्‍वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे स्वागत करण्यासाठी वारीमार्गावर पू. संभाजीराव भिडे यांच्या नेतृत्वाखाली सहस्रावधी धारकरी थांबले होते. त्यांच्यासमवेत रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आणि वढू येथून धर्मवीर संभाजी महाराज यांच्या अस्तित्वाचे प्रतीक मानल्या जाणार्‍या मशालीही होत्या. पालख्या येईपर्यंत सर्व धारकर्‍यांनी संतांचे अभंग म्हणत विठुमाऊलीच्या नामाचा गजर केला. संत ज्ञानेश्‍वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या आल्यावर धारकर्‍यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

पू. भिडेगुरुजी यांनी केले संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सारथ्य !

संत तुकाराम महाराज यांची पालखी आल्यावर पू. संभाजीराम भिडेगुरुजी यांनी काही अंतर पालखीचे सारथ्य करून संत तुकाराम महाराज यांना अभिवादन केले. पू. भिडेगुरुजी यांनी संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे सारथ्य करण्याचे हे दृश्य विलोभनीय होते.

अशी आहे भक्ती-शक्ती संगमाची परंपरा !

शिवरायांच्या कालखंडामध्ये पंढरपूरला जाणार्‍या दिंड्यांवर मोगल आक्रमण करत. त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे पंढरीच्या वारीचे रक्षण करायचे. शिवरायांनंतर धर्मवीर संभाजी महाराज यांनी ही परंपरा चालू ठेवली. तेव्हापासून वारकरी आणि धारकरी यांच्या एकमेकांविषयीचा कृतज्ञतेचा हा सोहळा चालू असल्याची परंपरा आहे.

धारकर्‍यांची शिस्त प्रशंसनीय !

या वेळी ५ सहस्रांहून अधिक धारकरी उपस्थित होते. हे सर्व धारकरी वारीमार्गावर एका ओळीत रांगेत बसले होते. त्यांनी पांढरा सदरा आणि पायजमा, अन् डोक्यावर भगवा फेटा परिधान केला होता. काहींनी छत्रपती शिवरायांच्या मावळ्याप्रमाणे वेशभूषा केली होती. सर्व धारकरी एकत्रितपणे अभंग म्हणत होते. संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखीचे रात्री ८ वाजता शिवाजीनगर येथे आगमन झाले; तोपर्यंत दुपारी बसलेले वारकरी रात्रीपर्यंत शिस्तबद्धतेने वारीमार्गावर बसून होते. धारकर्‍यांनी स्वत:हून पाण्याच्या बाटल्या गोळा करून कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी कचरा होणार नाही, याची काळजी घेतली.

पू. भिडेगुरुजी आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या अपकीर्तीचा हेतूपुरस्सर प्रयत्न ! – वासुदेव जोशी, धारकरी, सांगली

संत ज्ञानेश्‍वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीतील मंडळी मोठ्या प्रेमाने अन् आपुलकीने गुरुजींना पालखी रथाचे सारथ्य करण्यासाठी बोलावतात. गुरुजी काही मिनिटे रथाचे सारथ्य करतात. रथामधून उतरल्यावर गुरुजी भक्तीभावाने संतांच्या पादुकांना वंदन करतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून चालू आहे. काही मंडळी मात्र पू. भिडेगुरुजी आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांची अपकीर्ती करण्यासाठी खोटी वृत्ते देत आहेत.

संपादकीय भूमिका

हिंदूंमध्ये फूट पाडणारी अशी वृत्ते निषेधार्ह आहेत. क्षमायाचना करणारी अशी प्रसारमाध्यमे इस्लामसंदर्भात अशा स्वरूपाची वृत्ते कधीच लावत नाहीत, हे विसरून चालणार नाही !