Taslima Nasreen : ज्‍यांच्‍यामुळे शेख हसीना यांनी मला बांगलादेशातून हाकलले, त्‍यांच्‍यामुळेच हसीना यांनाही पलायन करावे लागले ! – तस्‍लिमा नसरीन

निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्‍लिमा नसरीन यांनी शेख हसीना यांच्‍यावर केली टीका !

डावीकडून शेख हसीना आणि तस्‍लिमा नसरीन

नवी देहली – निर्वासित बांगलादेशी लेखिका तस्‍लिमा नसरीन यांना बांगलादेशातील परिस्‍थितीवरून ‘एक्‍स’वर पोस्‍ट करत माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्‍यावर टीका केली आहे.

त्‍यांनी लिहिले आहे, ‘जेव्‍हा मी वर्ष १९९९ मध्‍ये माझ्‍या मरणासन्‍न आईला भेटण्‍यासाठी बांगलादेशात परतले, तेव्‍हा हसीना यांनी मला देशातून हाकलून दिले आणि पुन्‍हा न परतण्‍यास सांगितले. मुसलमानांना खूश करण्‍यासाठी त्‍यांनी हे केले. शेख हसीना यांना देश सोडण्‍यासाठी जी चळवळ राबवली गेली, त्‍यामागे हेच इस्‍लामी लोक आहेत.

त्‍यामुळे या परिस्‍थितीला शेख हसीना स्‍वतःच उत्तरदायी आहेत. त्‍यांनी इस्‍लामवाद्यांची भरभराट होऊ दिली. त्‍यांनी स्‍वतःच्‍या लोकांना भ्रष्‍टाचार करू दिला. आता बांगलादेश पाकिस्‍तानसारखा होऊ नये. बांगलादेशात सैनिकी राजवट नसावी. राजकीय पक्षांनी तेथे लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता आणली पाहिजे.’