कोल्हापूर – विशाळगडावरील अतिक्रमणाविषयी १४ जुलैला हिंदु संघटनांनी आंदोलन केले. यानंतर प्रशासनाने अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला असून प्रशासनाने हे अतिक्रमण अगोदरच काढले असते, तर हिंदु संघटनांना आंदोलन करण्याची वेळ आलीच नसती. त्यामुळे झालेल्या प्रकारास प्रशासनच उत्तरदायी असून शिवभक्तांवर अकारण गुन्हे नोंद करून त्यांना अटक केल्यास सकल हिंदु समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करील, अशा मागणीचे निवेदन सकल हिंदु समाजाच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या नावे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांना देण्यात आले.
या वेळी हिंदु एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले आणि श्री. किशोर घाटगे, श्री. अर्जुन आंबी, हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. मनोहर सोरप आणि श्री. नंदकुमार घोरपडे, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, महाराज प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. निरंजन शिंदे, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे संस्थापक श्री. शरद माळी, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, अखिल भारत हिंदु महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१. १४ जुलै या दिवशी विशाळगडाच्या पायथ्याशी आंदोलक जमले होते. तेव्हा तहसीलदार आणि प्रांताधिकारी आल्यानंतर त्यांनी आंदोलकांना संयम राखण्याच्या सूचना दिल्या. त्या वेळी आंदोलक आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात झालेल्या चर्चेच्या अंती १० जणांचे शिष्टमंडळ गडावर जाण्याचे निश्चित झाले. यानुसार १० शिवभक्त गडावर गेले असता गडावरील अतिक्रमण केलेल्या मुसलमान लोकांच्या जमावाने कोयते, कुर्हाडी, तलवार यांच्या साहाय्याने शिवभक्तांवर आक्रमण केले. यानंतर घायाळ झालेले शिवभक्त परत पायथ्याशी आल्यावर शिवभक्तांच्या भावनांचा उद्रेक झाल्याने त्यांनी प्रत्युत्तर दिले, अशी माहिती तेथील हिंदुत्वनिष्ठांना दिली.
२. या प्रकरणी प्रसिद्धीमाध्यमांमध्ये सकाळी काय घडले ? या संदर्भात अथवा अन्य ठिकाणी कुठेही चर्चा होतांना दिसत नाही. मुसलमान जमावाने शिवभक्तांवर आक्रमण केले त्यामुळेच पुढील उद्रेक घडला, अशी माहिती आम्हाला तेथील आंदोलकांनी दिली आहे. त्यामुळे या घटनेचे सखोल अन्वेषण करून सत्य परिस्थिती प्रशासनाने जाणून घ्यावी, तसेच ज्यांनी शिवभक्तांवर आक्रमण केले, त्यांच्यावर गुन्हे नोंद करून कारवाई करावी.
३. केवळ हिंदूंवर गुन्हे नोंद न करता अन्वेषण करतांना दोन्ही बाजू पडताळून सखोल अन्वेषण करून कारवाई करावी.
४. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, शिवभक्त, दुर्गप्रेमी यांनी इतकी वर्षे विविध आंदोलन करूनही प्रशासनाने अतिक्रमणांवर कारवाई न केल्यामुळेच हा उद्रेक झाला.
या प्रकरणी सकल हिंदु समाज अटक झालेल्या हिंदूंच्या मागे ठामपणे उभा असून त्यांना लागेल ते साहाय्य देईल, असे सकल हिंदु समाजाच्या वतीने या वेळी पत्रकारांना सांगण्यात आले. |