Israel Preparing to invade Lebanon : इस्रायल आता लेबनॉनवर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत !

तेल अविव – इस्रायलवर आक्रमण करणार्‍या हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेला लक्ष्य करण्यासाठी इस्रायली सैन्य लेबनॉनवर आक्रमण करण्याच्या सिद्धतेत आहे. हिजबुल्ला या आतंकवादी संघटनेकडून इस्रायलवर आक्रमण करण्यासां लेबनॉनची भूमी वापरली जात आहे. यासह या संघटनेकडे धोकादायक शस्त्रास्त्रांचा साठा असल्याच्या अहवालामुळे इस्रायलच नव्हे, तर अमेरिकाही घाबरली आहे.

इराणकडून हिजबुल्लाला मिळालेली शस्त्रे, हे इस्रायलच्या चिंतेचे कारण आहे. इराणकडून हिजबुल्लाला होणारा शस्त्रांस्त्रांचा पुरवठा रोखण्यासाठी अनेक उपाययोजना काढण्यात आल्या आहेत. असे असूनही हिजबुल्ला हा इस्रायलसाठी गंभीर धोका बनली आहे. इस्रायलने गाझापट्टीवर लक्ष केंद्रित केले असून तो हमासच्या आक्रमणांना तोंड देण्यात व्यस्त आहे. दुसर्‍या बाजूला हिजबुल्लाच्या आक्रमणांमुळे इस्रायलच्या संरक्षणावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आगामी काळात इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यात मोठा संघर्ष निर्माण होण्याची भीती आहे.

अमेरिकेकडून लढाऊ विमाने तैनात !

हिजबुल्लाला सामोरे जाण्यासाठी अमेरिकेने या प्रदेशात लढाऊ विमाने पाठवली आहेत. हिजबुल्लाने या प्रदेशात अमेरिकेच्या नौदलाच्या उपस्थितीला चेतावणी दिली आहे. या प्रदेशातील व्यापक संघर्षात हिजबुल्लाच्या प्रवेशाचे संभाव्य मोठे परिणाम होतील. हिजबुल्लाकडे केवळ मोठे भूदलच नाही, तर क्षेपणास्त्रे, लांब पल्ल्याचे रॉकेटस आणि आत्मघाती ड्रोन यांचा मोठा साठा आहे.

सीरिया आणि इराण या देशांतही हिजबुल्लाचा प्रभाव !

हिजबुल्लाचा सीरियासह इराणमध्येही मोठा प्रभाव आहे, तसेच त्याचे इराणी राजवटीशी थेट संबंध आहेत. यामुळे भविष्यात इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील संघर्ष व्यापक रूप धारण करू शकतो आणि यात अनेक देश ओढले जाऊ शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.