WB Train Accident : बंगालमध्ये मालगाडीची कंचनजंगा एक्सप्रेसला धडक : १५ ठार, ६० घायाळ

मालगाडीची कांचनगंगा एक्सप्रेसला धडक

दार्जिलिंग (बंगाल) : येथील रंगपाणी ते निजबारी या दरम्यान एका मालगाडीची कंचनजंगा एक्सप्रेसला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात ५ जण ठार, तर ३० जण घायाळ झाले. १७ जूनला सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

(सौजन्य : The Indian Express)

कंचनजंगा एक्सप्रेस सियालदह येथे जात होती. या अपघातात मृत्यू झालेले आणि घायाळ झालेले यांच्याविषयी अद्याप कुठलीही माहिती मिळालेली नाही. बचावकार्यासाठी आपत्ती निवारण पथके घटनास्थळी पोचली आहेत. घटनास्थळी ‘रिलीफ ट्रेन’ही पाठवण्यात आली आहे.

बचावकार्य चालू  ! – रेल्वेमंत्री

रेल्वेमंत्री अश्‍विनी वैष्णव

या अपघातानंतर रेल्वेमंत्री श्री. अश्‍विनी वैष्णव घटनास्थळी पोचले. ते म्हणाले,

‘‘बंगालमध्ये झालेला अपघात दुर्दैवी आहे. या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एन्.डी.आर्.एफ्.) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एस्.डी.आर्.एफ्.) यांची पथके पोचली असून बचावकार्य चालू आहे. घायाळ झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोचले आहेत.’’ श्री. वैष्णव यांनी मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य देणार असल्याचे घोषित केले, तसेच जे लोक गंभीररित्या घायाळ झाले आहेत, त्यांना अडीच लाख रुपये, तर जे किरकोळ घायाळ आहेत, त्यांना ५० सहस्र रुपये साहाय्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला शोक !

पंतप्रधान मोदी

या अपघाताच्या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की,

रेल्वेचा अपघात दुर्दैवी आहे. या अपघातात ज्यांच्या मृत्यू झाला, त्यांच्याप्रती मी शोक व्यक्त करतो, तसेच जे लोक घायाळ झालेत, ते लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना करतो.