‘गीता ज्ञान यज्ञ’ परीक्षेत अंध भूषण तोष्णीवाल प्रथम !

गीतेतील १८ अध्यायातील श्लोक मुखोद्गत !

श्री. भूषण तोष्णीवाल

वाकड (जिल्हा पुणे) – गीतेतील सर्व १८ अध्यायांतील शास्त्रशुद्ध श्लोक मुखोद्गत करण्याच्या ‘गीता ज्ञान यज्ञ’ परीक्षेत चिंचवडचे अंध भूषण तोष्णीवाल हे प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत. ही परीक्षा श्री साई जगद्गुरु शंकराचार्य संस्थानम् दक्षिणम् श्री शारदापीठम् श्रृंगेरी मठाचे वरिष्ठ शंकराचार्य यांच्या वतीने घेण्यात आली होती. स्वामी शंकराचार्य आणि उपस्थित मान्यवर यांनी त्यांचे कौतुक केले. भूषण हे अवघ्या २० दिवसांचे असतांना त्यांची दृष्टी गेली; मात्र प्रबळ इच्छाशक्ती, कठोर परिश्रम, परिपूर्णतेसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा, दृढ निश्चय, उपलब्ध साधनांचा सर्वोत्तम वापर करण्याची क्षमता यांमुळे त्यांनी अंधत्वावर मात केली, तसेच शैक्षणिक, संगीत, साहित्य कला क्षेत्रात आदराचे स्थान निर्माण केले आहे. सनदी लेखापाल बनलेल्या भूषण तोष्णीवाल यांचा जीवन प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

सध्या ते भारतभर विविध सीए कॉन्फरन्स घेतात. आस्थापने आणि महाविद्यालये यांमध्ये प्रेरक भाषणे देतात. देश-विदेशात शास्त्रीय आणि सुगम गायन सादर करतात. त्यांच्या या कामगिरीमुळे त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. भूषण यांच्याकडे संगीत, व्यवसाय व्यवस्थापन आणि विमा या विषयांत ६ पदव्युत्तर पदव्या आहेत. त्यांना भारत सरकार आणि सवाई गंधर्व महोत्सव समितीकडून संगीत कौशल्यासाठी, तसेच धीरूभाई अंबानी शैक्षणिक शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती.