केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने घेतलेल्या ‘सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम’ स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील ‘पाटगाव’ हे कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र विजेते महाराष्ट्रातील एकमेव गाव ठरले आहे. पाटगाव परिसरात मध निर्मिती आणि विक्री उद्योगाला प्रोत्साहन देऊन पाटगावचे मध जगभरात पोचवण्यासाठी राज्यशासन आणि प्रशासन यांच्या वतीने प्रयत्न होत आहेत. यासाठी जिल्हा नियोजन समितीने २२ कोटी ६७ लाख रुपयांचा निधी संमत केला असून आतापर्यंत १४ कोटी ९८ लाख रुपयांचा निधी वितरीत केला आहे. यातील ३१ लाख ७१ सहस्र रुपये व्यय करून ‘मधाचे गाव पाटगाव’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला. पाटगाव परिसरात सिद्ध होणारे मध शुद्ध आणि नैसर्गिक असून येथील मध नक्कीच चाखायला हवा, असाच आहे. – वृषाली पाटील, माहिती अधिकारी, कोल्हापूर
वर्षभरात ८ ते १० टन मधाचे उत्पादन !
सह्याद्रीच्या डोंगररांगांच्या पायथ्याशी वसलेले पाटगाव हे निसर्गरम्य ऐतिहासिक गाव ! कोल्हापूर शहरापासून साधारण ९० किलोमीटर अंतरावर असलेले केवळ १ सहस्र ५०२ लोकसंख्या असलेले हे गाव. पाटगाव अंतर्गत शिवडाव, अंतुर्ली, मठगाव, भारमलवाडी, डेळे, चांदमवाडी, मानी, तळी, भटवाडी या परिसरात मधमाशा पालन उद्योग केला जातो. पाटगाव परिसरात वर्षभरात साधारण ८ ते १० टन मध उत्पादन होते. महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या संकल्पनेतून आता ‘मधाचे गाव पाटगाव’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना या ठिकाणी राबवण्यात येत आहे.
पाटगावमध्ये पाटगावसह ५ ग्रामपंचायती एकत्र येऊन या ठिकाणी सिद्ध होणार्या शुद्ध आणि नैसर्गिक मधाची निर्मिती करण्यात येत आहे. सामूहिक सुविधा केंद्र आणि कृषी उत्पादक आस्थापनांच्या माध्यमातून या भागाचा विकास साधण्यात येत आहे. याठिकाणी माहिती केंद्र, ‘बी-ब्रीडिंग’ प्रशिक्षण, मधमाशा पूरक आणि औषधी गुणधर्म असलेली वृक्ष लागवड करण्यात येत आहे. पाटगाव येथील सदाहरीत जंगलातील मधाचे औषधी आणि उपयुक्त गुणधर्म आहेत.
शिवकालीन संत मौनी महाराज यांची जिवंत समाधी !
पाटगावमध्ये शिवकालीन संत मौनी महाराज यांची जिवंत समाधी आहे, तसेच वेदगंगा नदीवर वर्ष १९९० मध्ये बांधण्यात आलेले पाटगाव धरण म्हणजेच ‘मौनी जलाशय’ गावाच्या जवळच आहे. हे धरण आणि निसर्गरम्य ठिकाणी असलेला ‘रांगणा गड’ ही प्रमुख पर्यटनस्थळे पाटगाव परिसरात आहेत.
भविष्यातील नियोजन !
पाटगावमध्ये मधुमक्षिका पालनाबाबत माहिती देणारे माहिती केंद्र सिद्ध केले आहे. येथे भेट देणार्या नागरिकांना मधाच्या पेट्या, मधनिर्मिती प्रक्रिया पहाता येण्यासाठी लवकरच या ठिकाणी ‘हनी पार्क’ (मध उद्यान) सिद्ध करण्यात येणार आहे. पाटगावमध्ये उत्तम दर्जाच्या मधाचे उत्पादन, प्रक्रिया आणि विक्री यांच्या समवेत सामूहिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून मध प्रक्रिया केंद्र, प्रयोगशाळा, प्रशिक्षण आणि माहिती दालन उभारण्यात आले आहे. पाटगावचा मध जागतिक पातळीवर पोचवण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत…पण पाटगावचा शुद्ध आणि नैसर्गिक मध चाखायचा असेल, येथील निसर्गसौंदर्य पहायचे, अनुभवायचे असेल, तर ‘पाटगावला यायलाच लागतंय.. !’