दादर (दसपटी, चिपळूण) येथे दसर्यानिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या शस्त्रपूजन कार्यक्रमात हिंदु धर्म बांधवांनी घेतली प्रतिज्ञा
चिपळूण – हे महिषासुरमर्दिनी, देश आणि धर्म यांवर आलेल्या प्रत्येक संकटाचा निकराने प्रतिकार करून ते परतवून लावण्यासाठी तूच आम्हाला बळ प्रदान कर, ही प्रार्थना करून देव, देश आणि धर्म यांची कोणत्याही प्रकारची विटंबना आम्ही सहन करणार नाही , अशी प्रतिज्ञा दसर्यानिमित्त आयोजित शस्त्रपूजनाच्या वेळी धर्मनिष्ठ हिंदु बांधवानी केली.
श्री रामवरदायिनीदेवीची मूळ गादी देवघर, दादर (दसपटी) येथे हिंदु जनजागृति समिती आणि ग्रामस्थ यांच्या वतीने विजयादशमीनिमित्त आयोजित शस्त्रपूजन कार्यक्रम घेण्यात आला. ग्राम विकास मंडळ दादरचे अध्यक्ष श्री. मनोहर सकपाळ यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले.
या वेळी सर्वश्री संदीप पवार, विश्वनाथ सकपाळ, प्रशांत सकपाळ, सूरज पवार, अनंत सकपाळ, नारायण सकपाळ आदी ४५ जण उपस्थित होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने दसर्याचे अध्यात्मशास्त्रीय महत्त्व डॉ. हेमंत चाळके यांनी सांगितले. समितीचे सर्वश्री सचिन सकपाळ, जगदीशचंद्र यादव आणि रवींद्र शिंदे यांनी आयोजनात सहभाग घेतला.