नागपूर येथे आमदार नितीन देशमुख यांची जलसंघर्ष यात्रा पोलिसांनी रोखली !

५०० कार्यकर्त्यांसह आमदार देशमुख पोलिसांच्या कह्यात !

जलसंघर्ष यात्रेत चालताना मध्यभागी श्री नितीन देशमुख

नागपूर – ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख हे जलसंघर्ष यात्रा घेऊन येथील सीमेवर आले; मात्र पोलिसांनी त्यांची संघर्ष यात्रा धामना गावात अडवली. पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले. या वेळी कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. १० एप्रिल या दिवशी अकोला येथून यात्रेला प्रारंभ झाला होता. २१ एप्रिल या दिवशी नितीन देशमुख आणि त्यांचे सहकारी खारपण पट्ट्यातील समस्येला वाचा फोडण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर जाऊन आंदोलन करणार होते; मात्र त्यापूर्वीच नितीन देशमुख आणि त्यांच्या ५०० हून अधिक कार्यकर्त्यांना पोलीसांनी कह्यात घेतले.

श्री नितीन देशमुख यांना हात-पायांना पकडून त्यांना अटक करताना पोलीस कर्मचारी

या यात्रेने २५० किलोमीटरचे अंतर पार केले असून अद्याप ३० किलोमीटर अंतर जाणे बाकी होते. त्यापूर्वीच कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले. धामना गावातील परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आमदार देशमुख यांना पोलिसांनी अकोला येथे नेले आहे. आमदार नितीन देशमुख पत्रकारांशी बोलतांना म्हणाले, ‘‘पोलिसांनी कायद्याचा दुरुपयोग करत आम्हाला मारहाण केली. माझ्यासह अनेक कार्यकर्त्यांना कह्यात घेतले आहे. पोलिसांवर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रचंड दवाब आहे; मात्र काहीही झाले, तरी आम्ही माघार घेणार नाही.’’