लोकप्रतिनिधींचे आवाज काढून पोलिसांना फसवणारा तोतया पोलिसांच्‍या कह्यात !

पुणे – पोलीसदलातील बदलीसाठी तोतयाने वरिष्‍ठ अधिकारी असल्‍याचे सांगून पोलीस कर्मचारी रुस्‍तुम मुजावर यांच्‍याकडे पैशाची मागणी केली होती. मुजावर पुणे पोलिसांच्‍या गुन्‍हे शाखेत नियुक्‍तीस आहेत. त्‍यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्‍यात तक्रार नोंद केली. अमित कांबळे असे कह्यात घेतलेल्‍या तोतयाचे नाव आहे. या प्रसंगांमध्‍ये संशय आल्‍याने मुजावर यांनी तोतया अमित कांबळेची चौकशी केली. त्‍या वेळी तो तोतया असल्‍याचे लक्षात आले. कांबळे यांच्‍या विरोधात पुणे, नगर, रत्नागिरी जिल्‍ह्यांत फसवणुकीचे २५ गुन्‍हे नोंद आहेत. काही मासांपूर्वी त्‍यांनी येरवडा कारागृहातील महिला रक्षकाचीही फसवणूक केली होती. पोलीस कर्मचार्‍यांची बदली करणे, अंतर्गत चौकशीत साहाय्‍य करण्‍याच्‍या निमित्ताने पोलिसांकडे पैशांची मागणी करणे, लोकप्रतिनिधींचे हुबेहूब आवाज काढून फसवणूक करणे, असे गुन्‍हे त्‍याने केले आहेत. पोलीस नियंत्रण कक्षात संपर्क साधून तो पोलीस कर्मचार्‍यांची माहिती आणि भ्रमणभाष क्रमांक मिळवत असल्‍याचे उघड झाले आहे. पोलीस आयुक्‍तालयाच्‍या प्रवेशद्वारासमोर तोतया पोलिसाला कह्यात घेतले.

संपादकीय भूमिका

अशी फसवणूक करणार्‍यांना वेळीच कठोर शिक्षा न दिल्‍याचा परिणाम ! लोकप्रतिनिधी आणि पोलीस यांच्‍या नावे फसवणार्‍यांना पोलिसांचे भय नसल्‍याचे द्योतक !