आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा बनवण्याची शपथ घेऊया ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
७४ व्या प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोमंतकियांना शुभसंदेश दिला आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘प्रजासत्ताकदिन म्हणजे राज्यघटनेची निर्मिती करणार्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस आहे. राज्यघटनेमुळे प्रत्येक भारतियाला सर्व अधिकार प्राप्त झाले आहेत. राज्यघटनेने दिलेले मूलभूत अधिकार उपभोगतांना प्रत्येक नागरिकाने राज्यघटनेशी निगडित तत्त्वे अबाधित रहाण्यासाठी मूलभूत कर्तव्यांचेही पालन केले पाहिजे. भारताची अधिकाधिक प्रगती होण्यासाठी ‘आत्मनिर्भर भारत आणि स्वयंपूर्ण गोवा’ बनवण्याची सर्वांनी शपथ घेतली पाहिजे.
स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा आठवणींना उजाळा दिला पाहिजे ! – राज्यपाल
राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई त्यांच्या संदेशात म्हणतात, ‘‘प्रजासत्ताकदिनाच्या निमित्ताने ‘स्वराज्य’ प्राप्त करण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाच्या आठवणींना उजाळा दिला पाहिजे. गोवा ही एक पर्यटनभूमी आहे. गोव्यातील पर्यटन अधिकाधिक वृद्धींगत करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. ‘जी-२०’ परिषदेचे भारतात आयोजन होत आहे आणि या वेळी गोवा राज्यालाही तिच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्याची संधी मिळणार आहे.’’