संभाजीनगर, १ जानेवारी (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने संभाजीनगर शहरातील विजयनगर भागात श्रीराम मंदिर येथील सभागृहात हिंदु राष्ट्र-जागृती सभा मातृशक्तीच्या उत्स्फूर्त सहभागाने पार पडली. या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत हिंदु जनजागृती समितीच्या संभाजीनगर आणि जालना जिल्हा समन्वयक कु. प्रियांका लोणे, तसेच समितीच्या रणरागिणी शाखेच्या सौ. रोहिणी जोशी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. श्वेता आगळगावकर यांनी केले.
या हिंदु राष्ट्र-जागृती सभेस माजी नगरसेविका सौ. विमलताई केंद्रे आणि माजी उपमहापौर श्री. राजेंद्र जंजाळ यांचीही उपस्थिती लाभली होती.
धर्मपालन आणि धर्माचरण यांनी आपण हिंदु स्वतः सक्षम होऊन हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकतो ! – कु. प्रियांका लोणे
आज हिंदु स्त्रियांवरील वाढते अत्याचार, संभाजीनगर शहरातील आपली सद्यःस्थिती, लव्ह जिहाद यांसारख्या षड्यंत्राची वाढती क्रूरता ही हिंदूंसाठी धोक्याची घंटा आहे. आपापसातील मतभेद बाजूला ठेवून हिंदु म्हणून सर्वांनी संघटित होणे, धर्मपालन करणे आणि हिंदु राष्ट्राची संविधानिक मागणी करणे आज आवश्यक आहे. धर्माधिष्ठित हिंदूच खर्या अर्थाने हिंदु राष्ट्राची स्थापना करू शकतो, असे प्रतिपादन या वेळी बोलतांना त्यांनी केले.
सौ. रोहिणी जोशी यांनी उपस्थित मातृशक्तीला सध्या सर्वांसमोर असलेले ‘लव्ह जिहाद’ या समस्येचे निराकरण करण्यासाठीचे उपाय सांगितले. प्रत्येक मुलीने, युवतीने आणि स्त्रीने स्वतःमधील देवीतत्त्व जागृत करण्यासाठी शक्तीची उपासना करणे, कुलदेवतेची उपासना करणे कसे आवश्यक आहे ?, हे सांगितले. शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या स्वतःला सक्षम केल्यास झाशीच्या राणीप्रमाणे आपणही आपल्या राष्ट्रासाठी कृती करू शकणार, असेही त्या म्हणाल्या.
उपस्थितांनी ‘अशा प्रकारच्या सभा ठिकठिकाणी घेतल्या जाव्यात’, असे मनोगतही व्यक्त केले.
क्षणचित्रे
१. ही सभा केवळ ४ दिवसांत आयोजित करून सौ. विमलताई केंद्रे आणि श्री. राजेंद्र जंजाळ यांच्या सहकार्याने पार पडली.
२. या सभेस पुष्कळ धर्मप्रेमी उपस्थित होते. यामध्ये महिला आणि युवती यांची उपस्थिती अधिक होती.