‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर यांच्या विरोधात कठोर कायदे करा !

चिपळूण येथे हिंदु जनजागृती समितीच्या आंदोलनात हिंदुत्वनिष्ठांची महाराष्ट्र सरकारकडे मागणी

हिंदु जनजागृती समितीच्या आंदोलनात सहभागी झालेले हिंदुत्वनिष्ठ

चिपळूण, १२ डिसेंबर (वार्ता.) – ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून सहस्रो हिंदु तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे भयंकर शोषण करणे, धर्मांतर आणि हत्यासत्र चालू आहेत. ‘श्रद्धा वालकर’सारख्या आणखी किती युवतींची हत्या झाल्यावर पोलीस प्रशासन कायदा करणार आहे ? त्यामुळे महाराष्ट्र सरकारने तात्काळ ‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांतर यांच्या विरोधात कठोर कायदे करावेत, अशी मागणी हिंदुत्वनिष्ठांनी केली. येथील नगर परिषदेसमोर ११ डिसेंबरला सकाळी ११ वाजता हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात वरील मागण्या करण्यात आल्या. या मागण्यांचे निवेदन १३ डिसेंबर २०२२ या दिवशी येथील प्रांताधिकारी यांना देण्यात येणार आहे. आंदोलनाचे सूत्रसंचालन कु. दिव्या घाग यांनी केले.

मान्यवरांचे विचार –

सौ रश्मीताई गोखले, बाळासाहेबांची शिवसेना, महिला जिल्हा संघटक – हिंदु युवतींना धर्मशिक्षण नसल्यामुळेच त्या ‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्राला बळी पडत आहेत. गायी आणि कोंबड्यांप्रमाणे हिंदु तरुणींनी स्वतःची गत करून घेऊ नये.

डॉ. (सौ.) साधना जरळी, रणरागिणी, हिंदु जनजागृती समिती – झाशीची राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांच्या अत्याचारांच्या विरोधात लढा दिला. हाच आदर्श हिंदु नारीने घेऊन ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात निर्भयपणे लढले पाहिजे.

श्री. सुरेश शिंदे , हिंदु जनजागृती समिती – हिंदूबहुल देशात हिंदु युवतीचे ३५ तुकडे करण्याचे धाडस धर्मांधांमध्ये का निर्माण होत आहे, याचा हिंदूंनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. यासाठी हिंदूंचे प्रभावी संघटन होणे, हाच एकमेव उपाय आहे.

श्री. शशिकांत मोदी, माजी नगरसेवक, शिवसेना – ‘लव्ह जिहाद’चे संकट हिंदूंच्या घरापर्यंत पोचले आहे. त्यामुळे हिंदूंनी आता याकडे दुर्लक्ष करायला नको. हिंदूंनी स्वत:च्या मुलांना धर्माचरण शिकवावे.

‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा हवा ! – विनय पानवळकर, हिंदु जनजागृती समिती

खोटे नाव आणि खोटी ओळख सांगणे, फसवणे, महागडी ‘गिफ्ट’ देणे अशा अनेक माध्यमातून हिंदु तरुणींना ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवून त्यांच्यावर अत्याचार केले जात आहेत. शासनाने या घटनांची गंभीरता आणि तीव्रता लक्षात घेऊन ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कठोर कायदा केला पाहिजे.

आंदोलनाला उपस्थित लोकप्रतिनिधी, हिंदुत्वनिष्ठ आणि मान्यवर

भाजप शहराध्यक्ष आशिष खातू, रत्नदीप देवळेकर, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष निखिल किल्लेकर, ह.भ.प. मनोहर घाग, विश्‍व हिंदु परिषदेचे उदय सलागरे, बाळासाहेबांची शिवसेनेच्या शहर महिला आघाडी शहरप्रमुख सौ. प्राजक्ता टकले, राष्ट्रसेविका दलाच्या सौ. श्रद्धा फडके, सौ. वर्षा पराग ओक, कालिका माता महिला मंडळाच्या श्रीमती रश्मी डेरे, सौ. शुभलक्ष्मी दांडेकर, अडरे ग्रामपंचायत सदस्या सौ. दीक्षा कांबळी, पेठमाप महाकाली देवस्थानचे श्री. मोहन तांबट आदी १०५ जण आंदोलनात उपस्थित होते.

‘लव्ह जिहाद’विषयी हिंदूंचे प्रबोधन होऊ नये; म्हणून हिंदूंवर दबाव आणणारे धर्मांध !

हे आंदोलन चालू असतांना दोघे जण दुचाकीवरून आले. त्यातील एका धर्मांध युवकाने आंदोलनाला विरोध करण्यास चालू केले. ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे खोटी आहेत, तुम्ही हे आंदोलन बंद करा’, असे अरेरावीने आणि हातवारे करत मोठ्या आवाजात आंदोलनातील महिलांसमोर उभे राहून तो बोलू लागला. त्यामुळे आंदोलनात गडबड झाली. समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनस्थळी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांच्या ही गोष्ट लक्षात आणून दिल्यावर पोलिसांनी त्याला कह्यात घेतले. (बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांना हे का सांगावे लागते ? पोलिसांनी स्वतःहून कृती करणे अपेक्षित आहे ! – संपादक) आंदोलन संपल्यावर हिंदुत्वनिष्ठांनी समाजकंटक धर्मांध युवकावर कठोर कारवाई करण्यासाठीची लेखी तक्रार दिली. या वेळी ‘आम्ही कारवाई करू’, असे आश्‍वासन पोलिसांनी दिले.