हिंदूंनो, शक्तीदायिनी विजयादशमी कशी साजरी कराल ?

शमीपूजन

पुढील श्लोकांनी शमीची प्रार्थना करतात.

शमी शमयते पापं शमी लोहितकण्टका ।
धारिण्यर्जुनबाणानां रामस्य प्रियवादिनी ॥
करिष्यमाणयात्रायां यथाकाल सुखं मया ।
तत्र निर्विघ्नकर्त्री त्वं भव श्रीरामपूजिते ॥

अर्थ : शमी पाप शमवते (नष्ट करते). शमीचे काटे तांबूस असतात. शमी रामाला प्रिय बोलणारी असून अर्जुनाच्या बाणांचे धारण करणारी आहे. हे शमी, रामाने तुझी पूजा केली आहे. मी यथाकाल विजययात्रेला निघणार आहे. ही यात्रा तू मला निर्विघ्न आणि सुखकारक कर.


आपट्याचे पूजन

या वेळी पुढील मंत्र म्हणतात –

अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण ।
इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रुविनाशनम् ॥

अर्थ : हे अश्मंतक महावृक्षा, तू महादोषांचे निवारण करणारा आहेस. तू मला मित्रांचे दर्शन घडव आणि शत्रूंचा नाश कर.

नंतर त्या वृक्षाच्या मुळाशी तांदूळ, सुपारी आणि सुवर्णनाणे (विकल्पाने तांब्याचे नाणे) ठेवतात. मग वृक्षाला प्रदक्षिणा घालून त्याच्या बुंध्याजवळची थोडी माती आणि त्या वृक्षाची पाने घरी आणतात.

शमीची नाही; पण आपट्याची पाने सोने म्हणून देवाला वहातात आणि इष्टमित्रांना देतात. सोने हे लहानांनी मोठ्यांना द्यायचे असते, असा संकेत आहे.


अपराजितापूजन

ज्या ठिकाणी शमीची पूजा होते, त्याच ठिकाणी भूमीवर अष्टदल काढून त्यावर अपराजितेची मूर्ती ठेवतात आणि तिची पूजा करून पुढील मंत्राने प्रार्थना करतात.

हारेण तु विचित्रेण भास्वत्कनकमेखला ।
अपराजिता भद्ररता करोतु विजयं मम ॥

अर्थ : गळ्यामध्ये चित्रविचित्र हार घालणारी, जिच्या कमरेत चकाकणारी सुवर्णमेखला आहे अशी आणि (भक्तांचे) कल्याण करण्याच्या कामी तत्पर अशी अपराजितादेवी मला विजय देवो.

काही ठिकाणी अपराजितेची पूजा सीमोल्लंघनाला निघण्याच्या पूर्वीही करतात.


राजविधान

दसरा हा विजयाचा सण असल्यामुळे या दिवशी राजेलोकांना विशेष विधान सांगितले आहे.


लौकिक प्रथा

काही घराण्यांतील नवरात्र (देवी) नवमीच्या दिवशी, तर काहींचे दशमीच्या दिवशी विसर्जित होते.’