कामगार कायद्यांमुळे रोजगारात वाढ होणार ! – भूपेंद्र यादव, केंद्रीय मंत्री

पुणे – नवीन कामगार कायद्यांमध्ये कामगारांची सुरक्षितता, आरोग्य, आर्थिक सक्षमीकरण इत्यादी गोष्टींवर विचार केल्याने नवीन रोजगारामध्ये वाढ होण्यास साहाय्य होणार आहे. त्यामुळे कामगार कायद्याच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची निर्मिती होण्यास साहाय्य होईल, असे मत केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी व्यक्त केले. ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट’च्या वतीने ‘कामगार कायद्यांची कार्यवाही’ या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते. या वेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कामगारमंत्री, आय.पी.एम्.चे राष्ट्रीय अध्यक्ष, नॅशनल युवा को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष, कामगार आयुक्त, अपर कामगार आयुक्त आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव पुढे म्हणाले की,

१. कामगारांकडून अल्प वेळेत जास्त उत्पादन करून उद्योग क्षेत्रात वाढ करण्याचा प्रयत्न आहे.

२. सार्वजनिक सेवा केंद्रांच्या माध्यमातून संघटित आणि असंघटित कामगारांची नोंदणी केली जात आहे.

३. महिलांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कामाच्या ठिकाणी पोषक वातावरण निर्माण करून देण्यासाठी औद्योगिक आस्थापनांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.

४. नवीन कामगार कायद्यात स्त्री-पुरुष यांना समान वागणूक देऊन समान वेतन देणार.

५. मालक आणि कामगार यांच्यामध्ये चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न या कायद्यामध्ये आहे.

६. उद्योगक्षेत्र मजबूत करण्यासाठी कामगारांच्या समस्या आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणार आहे.

अमृता करमरकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर नरेंद्र पाटील यांनी आभार मानले.