बांगलादेशी नागरिकांशी संबंधित प्रकरणात उत्तरप्रदेशच्या देवबंदमध्ये ‘एन्.आय.ए.’ची पुन्हा धाड !

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – बांगलादेशी नागरिकांशी संबंधित प्रकरणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने) उत्तरप्रदेशमधील देवबंदमध्ये पुन्हा धाड टाकली. हे नागरिक बंदी असलेल्या ‘जमात-उल्-मुजाहिदीन बांगलादेश’ (जे.एम्.बी.) या बांगलादेशी आतंकवादी संघटनेच्या विचारसरणीचा भारतात प्रसार करत होते, तसेच ते येथील तरुणांना भारताविरुद्ध जिहाद करण्यासाठी भडकवत होते, असे ‘एन्.आय.ए.’च्या प्रवक्त्याने सांगितले.

‘एन्.आय.ए.’च्या पथकाने बनावट पासपोर्ट आणि बनावट आधारकार्ड बनवल्याच्या प्रकरणी दारुल उलुम वक्फ भागातून मुस्तकीम याला कह्यात घेतले. त्याच्याकडून संगणक आणि इतर साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

हे प्रकरण ‘जमात-उल्-मुजाहिदीन बांगलादेश’ या बंदी घातलेल्या आतंकवादी संघटनेच्या ६ कार्यकर्त्यांच्या अटकेशी संबंधित आहे, ज्यांना यापूर्वी भोपाळमधून अटक करण्यात आली होती. यामध्ये ३ बांगलादेशी नारिकांचा समावेश आहे. यांतील काही जण बनावट कागदपत्रांच्या आधारे देवबंदमध्ये शिकत होते.

आता उत्तरप्रदेश देवबंदमध्ये शिकणार्‍या विदेशी विद्यार्थ्यांची नव्याने चौकशी करणार

‘एन्.आय.ए.’च्या कारवाईनंतर आता उत्तरप्रदेश पोलिसांनीही कारवाई चालू केली. देवबंदमध्ये शिकणार्‍या विदेशी विद्यार्थ्यांची नव्याने चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती सहारनपूरचे पोलीस अधीक्षक सूरज कुमार राय यांनी दिली.