श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे त्वरित आज्ञापालन करणारे आणि सेवेची तीव्र तळमळ असलेले श्री. प्रकाश करंदीकर !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे त्वरित आज्ञापालन करणारे आणि सेवेची तीव्र तळमळ असलेले रामनाथी (गोवा) येथील श्री. प्रकाश करंदीकर (वय ६४ वर्षे) !

‘३.१.२०२२ या दिवशी श्री. प्रकाश करंदीकर यांची मृत्युंजय महारथी शांती आहे. त्या निमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. प्रकाश करंदीकर आणि सौ. छाया करंदीकर

सौ. छाया प्रकाश करंदीकर (पत्नी)

१. काटकसरी : ‘आमचे लग्न झाल्यापासून श्री. करंदीकर यांनी स्वतःसाठी कधीच उंची कपडे किंवा अन्य उंची वस्तू वापरल्या नाहीत. आम्ही त्यांना आग्रह केल्यावर ते म्हणायचे, ‘‘माझ्याकडील कपडे किंवा वस्तू अजून चांगल्या असतांना नवीन कशाला घ्यायच्या ?’’

२. आश्रमात सर्वांशी मिळूनमिसळून रहाण्याचा प्रयत्न करणे : वर्ष २०११ मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि ते पूर्णवेळ साधना करण्यासाठी रामनाथी आश्रमात आले. त्यांची प्रकृती अबोल असल्यामुळे त्यांना आश्रमातील सर्वांशी मिळूनमिसळून रहाण्यास जमत नव्हते; पण त्यांनी त्यावर चिकाटीने प्रयत्न करून सर्वांशी मिळनमिसळून रहाण्याचा प्रयत्न केला.’

श्री. सिद्धेश करंदीकर

श्री. सिद्धेश प्रकाश करंदीकर (मुलगा)

१. साधनेला प्राधान्य देऊन त्यासाठी साहाय्य करणे : ‘अनेक वेळा मला आश्रमातील सेवांमुळे घरच्या कामांत लक्ष देता येत नाही, तरी ते मला ‘तू आश्रमात जाऊ नकोस’, असे कधीच म्हणत नाहीत. ते घरातील कामे करतात.

२. वडिलांनी केलेली समष्टी साधना

२ अ. ‘नामजपाचे महत्त्व समाजाला समजावे’, यासाठी नामजपाचे लाभ लिहून त्याच्या पुष्कळ प्रती काढून त्या घरोघरी वितरित करणे : आम्ही साधनेत आलो, तेव्हा नामसाधना महत्त्वाची होती. ‘नामजपाचे महत्त्व सर्वांना ठाऊक व्हावे’, यासाठी त्यांनी ‘नामजप केल्याने होणारे लाभ’, हे एका कागदावर लिहून काढले, उदा. ‘नामजपामुळे मन प्रसन्न रहाते, नामजपामुळे प्रारब्ध न्यून होते’, इत्यादी. अशी त्यांनी १२ ते १५ सूत्रे एकत्र करून एक पत्रक बनवले आणि त्याच्या पुष्कळ प्रती छापून घेतल्या. इतकेच नव्हे, तर ‘ती प्रत खराब होऊ नये’, यासाठी त्यांनी त्या प्रती प्लास्टिक पिशवीमध्ये घातल्या आणि ‘ते पत्रक घरात लावता यावे’, यासाठी त्याला दोरे बांधले. त्यानंतर त्यांनी ही पत्रके घरोघरी वितरीत केली.

२ आ. सनातनच्या ग्रंथांना चांगला प्रतिसाद मिळण्यासाठी प्रत्येक ग्रंथातील ठळक सूत्रांवर प्रश्न काढून ते जिज्ञासूंना सांगणे, त्यांच्या या नवीन संकल्पनेमुळे ग्रंथविक्री वाढणे : पूर्वी बाबा मुंबईत प्रसाराची सेवा करायचे. एकदा ग्रंथ प्रदर्शनाची सेवा करतांना ‘प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या सात्त्विक उत्पादनांना (उदबत्ती, कापूर इत्यादी) चांगला प्रतिसाद मिळत आहे’, असे त्यांच्या लक्षात आले. तेव्हा ‘सनातनच्या ग्रंथांना चांगला प्रतिसाद मिळण्यासाठी काय करू शकतो ?’, याचा ते अभ्यास करू लागले. त्यानंतर त्यांनी ग्रंथातील ठळक सूत्रे प्रश्न रूपाने एकत्रित केली आणि प्रत्येक ग्रंथातील प्रश्न काढून त्याची एक धारिका सिद्ध केली, उदा. ‘आपल्या आयुष्यात गुरूंचे महत्त्व काय ?’, ‘शिष्य कुणाला म्हणतात ?’, इत्यादी. ग्रंथ प्रदर्शन पहाण्यासाठी येणार्‍या व्यक्तीला प्रथम ते ती धारिका दाखवत असत. ती धारिका पाहून ‘आपल्याला त्या ग्रंथातून काय माहिती मिळणार आहे ?’, हे जिज्ञासूंना लगेच कळत असे. त्यामुळे ग्रंथांना मिळणारा प्रतिसाद वाढल्याचे लक्षात आले.’

सौ. सायली करंदीकर

सौ. सायली सिद्धेश करंदीकर (सून)

१. सहजता : ‘माझ्या लग्नानंतर मी सासरी आल्यावर बाबांशी (सासर्‍यांशी) बोलतांना मला काही वेगळेपणा वाटलाच नाही. ते माझे सासरे असूनही माझ्याशी वडिलांप्रमाणे सहजतेने बोलतात.

२. आज्ञापालन करणे : वर्ष २०१८ मध्ये माझ्या आईने (श्रीचित्‌शक्‍ति(सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी) त्यांना सांगितले, ‘‘तुम्ही नियमितपणे अग्निहोत्र करा. त्यामुळे तुमची समष्टी साधना होईल.’’ त्यानंतर त्यांनी प्रतिदिन अग्निहोत्र करण्यास आरंभ केला.’

३. सेवेची तळमळ : दळणवळण बंदीच्या काळापासून बाबांना ‘ऑनलाईन’ सत्संगाची सेवा आहे. ते ती सेवा उत्साहाने, पुष्कळ तळमळीने अन् भावपूर्ण करतात. अनेक वेळा त्यांना रात्री उशिरा सेवेचा निरोप येतो. त्यामुळे त्यांना झोपायला पुष्कळ उशीर होतो, तरी त्यांचे त्याविषयी कधी गार्‍हाणे नसते.’

(सर्व सूत्रांचा दिनांक २४.१२.२०२१)