वीरमाता आणि वीरपत्नी यांच्या त्यागाचे मूल्यमापन होऊ शकत नाही ! – खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले

सातारा, १२ डिसेंबर (वार्ता.) – आपल्याला नतमस्तक व्हायचे असेल, तर देवापुढे किंवा सैनिकांपुढे व्हावे लागेल. सैनिकांमुळे हा देश आहे. वीरमाता आणि वीरपत्नी यांचा सत्कार करतांना त्यांना कोणत्या दु:खाला सामोरे जावे लागले असेल याची कल्पना येते. त्यांच्या त्यागाचे मूल्यमापन होऊच शकत नाही, असे गौरवोद्गार खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काढले.

वर्ष १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाली. या निमित्ताने या युद्धामध्ये सहभागी झालेल्या माजी सैनिकांचा सत्कार समारंभ येथील सैनिक स्कूलच्या सभागृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत होते.

खासदार भोसले पुढे म्हणाले, ‘‘सैनिकांनी विविध बटालियनमध्ये काम करत देशाच्या संरक्षणाला प्राधान्य दिले. सैनिक आपले तरुणपण देशसेवेसाठी समर्पित करतो. निवृत्तीनंतर काय करायचे ? हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यांच्यासाठी काही उद्योग उभारणी करण्याचा माझा विचार आहे, तसेच जिल्ह्यातील युवकांना सैन्यात भरती होण्यासाठी संधी मिळावी, यासाठीही माझे प्रयत्न चालू आहेत.’’

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. तत्पूर्वी तीनही सैन्यदलांचे प्रमुख बिपीन रावत यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या वेळी खासदार भोसले यांच्या हस्ते भारत-पाकिस्तान युद्धातील २२ हून अधिक माजी सैनिक, वीरमाता आणि वीरपत्नी यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.