बालगंधर्व नाट्यगृह सुधारणाकामात सांगली महापालिका आयुक्त आणि संबंधित नगरसेवक यांच्या पाठपुराव्यामुळे गती ! – श्रेयस गाडगीळ

दुरुस्ती कामानंतर सुसज्ज झालेले बालगंधर्व नाट्यगृह

मिरज, २५ सप्टेंबर (वार्ता.) – येथील बालगंधर्व नाट्यगृहात सुधारणा होण्यासाठी विविध रंगकर्मींनी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेचे आयुक्त यांचा पाठपुरावा केला होता. यामुळे ९८ लाख रुपयांची विकासकामे चालू असून आयुक्त आणि संबंधित नगरसेवक यांच्या पाठपुराव्यामुळे गती मिळत आहे, असे मत अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे श्री. श्रेयस गाडगीळ यांनी व्यक्त केले आहे.

श्री. श्रेयस गाडगीळ पुढे म्हणाले, ‘‘पिण्याच्या पाण्यासाठी ‘वॉटर प्युरिफायर’, मंचावरील विद्युत् व्यवस्था, विज्ञापन लावण्यासाठी फलक, शिडी, खुल्या व्यासपिठावरील ध्वनीयंत्रणा-विद्युत् व्यवस्था यांसह अन्य कामे पूर्णत्वास जात आहेत. मिरजकर रंगकर्मींनी सुचवलेल्या बहुतांश सुधारणा प्रशासनाकडून होत आहेत. याशिवाय उर्वरित असलेली नाट्यगृहाच्या नियमावलीचा फलक दर्शनी ठिकाणी लावणे, छोटे तळघर, अशी अन्य कामे लवकरच पूर्ण होतील, अशी मिरजकरांना आशा आहे.’’